गेली दोन वर्ष डिजिटल विश्वात दमदार कंटेंट देत नेहमी अग्रगण्य क्रमांकावर असलेल्या कॅफेमराठी ने आजवर वेब शोज, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म स्पर्धा, स्टँडअप कॉमेडी शोज असे अनेक उपक्रम राबवले होते. गेल्या वर्षी कॅफेमराठीला गुगुल इंडियाचा युट्यूब नेक्स्टअप पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतेच कॅफेमराठीने “कॅफेमराठी कॉमेडी चॅंम्प २०१९” या स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत स्टँडअप कॉमेडी, एकपात्री प्रयोग, विनोदी लघु नाटिका,मिमिक्री इ.प्रकारात संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ३ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, पैकी ९० स्पर्धकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. याचे संपूर्ण श्रेय कॅफेमराठीचे संस्थापक निखील रायबोले आणि भूपेंद्र्कुमार नंदन यांना जाते. अशा स्पर्धेमुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळते आहे.

मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे युट्यूबच्या भव्य-दिव्य अशा सेटवर दोन दिवस ही स्पर्धा झाली त्यात मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद आणि इतर भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली कला सादर केली. सुरभी पारकर हिच्या रंगतदार सूत्र-संचालनाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. विशेष बाब म्हणजे स्पर्धकाचा अभिनय पाहून चित्रीकरण करणाऱ्या चमूची द्खील मुरकुंडी वळली होती. कलाकार हा शहरी ग्रामीण असा काहीच नसतो कलाकार कालकारच असतो, आणि जो प्रेक्षकाचे मनमुराद मनोरंजन करतो तोच खरा विनोदी कलाकार असतो, याचा प्रत्यय वेळोवेळी येत होता. महान हास्य कलाकार चार्ली चाप्लीन यांच्या म्हणण्यानुसार “असफलता महत्वपूर्ण आहे आणि आपण स्वतः आपल्यावर विनोद करणे हे खूप धाडसाचे काम असते. असाच काहीसा योगायोग इथे बघायला मिळाला होता.

या शोसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्रसिद्ध विनोदी अभिनेते विनय येडेकर यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वप्रथम भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले कारण इतक्या पावसात देखील सर्व महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून प्रवास करत आले. या स्पर्धेतूनच उद्याचे कलाकार घडणार आहेत असेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रात येण्याआधी तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करा, सोबत एक नोकरीकिंवा उद्योगधंदा असू द्या. या क्षेत्रात पूर्ण झोकून देऊन काम मिळतंच असं नाही.पण प्रयत्न करायचे नाहीत असंही नाही. म्हणून सुरक्षित पावलांनी या क्षेत्रात पदार्पण करावे असे त्यांनी सांगितले आणि कॅफेमराठीच्या या स्तृत्य उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.