अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे तर अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आपल्यातल्या टॅलेंटची झलकही रसिकांना दाखवली. सतत शिकत राहण्याची प्रवृत्ती अमोलला शांत बसू देत नाही म्हणूनच अमोल आपल्या अमोल कागणे फिल्म्स या बॅनरद्वारा पहिल्यांदाच एका सोलो म्युझिक अल्बम रसिकांसाठी घेऊन येत आहे. मेधा एन्टरप्रायझेस, के.बी.एन्टरटेनमेन्ट निर्मित आणि प्रदीप पंडित कालेलकर दिग्दर्शित ‘बाप्पा मोरया’ हा अल्बम लवकरच गणेश भक्तांसाठी उपलब्ध होणार आहे.
श्रावणाच्या धुंद-कुंद वातावरणात आपल्या सणासुदीला सुरुवात झाली असून गणेशाच्या आगमनाकडे साऱ्या भाविकांचे लक्ष लागले आहे. बाप्पाच्या सेवेसाठी सारेजण आपापल्यापरीने तयारीस लागले असताना अमोल कागणे ‘बाप्पा मोरया’ हे गीत घेऊन आले आहेत. मनीषा ठाकूर आणि मेधा राऊत निर्मित ‘बाप्पा मोरया’ मध्ये जल्लोष आहे गणेशाच्या आगमनाचा. उल्हास आहे भक्तांचा. ”बाप्पा तुझे भक्त सारे नाचतीया जोरात, पडता तुझे पाऊल आज जोश या पोरांत,
हर्ष या मनी पसरला रूप तुझे पाहून, हे गणेशा तूच ये संकटात तूच धावुनी, पहिले नमन देवाला करूया.. बाप्पा मोरया’ असे जोशपूर्ण बोल प्रत्येकाला ठेका धरायला लावतील यात काही शंका नाही. भक्तिमय गुलालाची उधळण असणाऱ्या ‘बाप्पा मोरया’ या गाण्याने गणेशोत्सवात चारचाँद लागतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत मेधा एन्टरप्रायझेस, के.बी.एन्टरटेनमेन्ट निर्मित आणि सुनीता प्रदीप कालेलकर सहनिर्मित ‘बाप्पा मोरया’ या संगीत अल्बमचे दिग्दर्शन प्रदीप पंडित कालेलकर यांनी केले आहे. गणेशभक्तांच्या मनीचे भाव सईद अख्तर यांनी शब्दबद्ध केले आहेत तर प्रसिद्ध गायक-संगीतकार विजय गटलेवार यांनीच हे भक्तीगीत संगीतबद्ध करत गेले देखील आहे. गणेशाचे मनमोहक रूप टिपणारं छायांकन सतीश काकडे यांचे असून शार्दूल कुवार यांनी ‘बाप्पा मोरया’ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संकलनाची जबाबदारी सज्जल रे यांनी सांभाळली आहे तर वेशभूषा – अकबर खान, कलादिग्दर्शन – प्रमोद कालेलकर, रंगभूषा – प्रशांत उजवणे अशी इतर श्रेयनामावली आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘हलाल’, ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ यांसारख्या चित्रपटांनी अमोल कागणे फिल्म्स संस्थेला एक आश्वासक निर्मितीसंस्थेची ओळख मिळवून दिली आहे. २६ हून अधिक नाटकात अभिनय करणाऱ्या अमोलच्या संस्थेचे येत्या वर्षभरात एकूण ६ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत हे विशेष. खूप कमी जणांना आपल्या कामाविषयी असणारी तळमळ समाजापुढे मांडता येते अमोल कागणे हे त्यातलंच एक नाव. मनोरंजनक्षेत्राच्या मायाजालात अडकणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पण अमोल त्यात अडकला नाही तर या मायाजालात दिवसेंदिवस स्वतःला सिद्ध करताना दिसतोय. त्याच्या येणाऱ्या आगामी सर्व प्रोजेक्ट्सना बाप्पा नेहमी यश मिळवून देवो हीच सदिच्छा.