मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण हे जाणतो आहोतच की, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील आदर्श जोडपे समजले जाणारे आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiron Rao) यांनी शनिवार दि. ०३ जुलै २०२१ रोजी परस्परांच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे बॉलीवूड चित्रनगरी आणि त्यांचे असंख्य चाहते यांच्यासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक सामाजिक प्रोजेक्टवर एकत्रित काम केलं आहे. आम्ही दोघं पती-पत्नी म्हणून विभक्त होत असलो तरी एक जबाबदार पालक आणि एक परिवार म्हणून आम्ही कायमच एकत्रित राहू असं आमिर आणि किरण राव यांनी म्हटलं आहे.
आमिर आणि किरणने एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विभक्त होण्याचं कोणतही कारणं मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आमिरने दुसऱ्यांदा घटस्फोट का घेतला असा प्रश्न चाहत्यांना भेडसावू लागला आहे. मात्र याचदरम्यान आमिरच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री फातिमा सना शेखचं नाव चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर फातिमाच्या नावाच्या जोरदार चर्चा असून या संदर्भातील अनेक मीम्सना उधाण आलं आहे.
किरणनंतर आता आमिरच्या आयुष्यात फातिमा येणार अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमानंतर देखील अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत आमिरचं नाव जोडलं गेलं होतं. फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र फातिमानं कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत आमिर सोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
आमिर खानचं स्थान माझ्या आय़ुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मला स्वत:वर आणि आमच्या मैत्रीवर परिणाम करून घ्यायचा नाही, असंही त्यावेळी बोलतांना फातिमा म्हणाली होती. तसेच आमिर सोबतचं फातिमाचं तसलं काही नातं असल्याचं वृत्त खुद्द आमिरची द्वितीय पत्नी किरण राव यांनीही फेटाळून लावलं होतं.
दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.
या दोघांच्या घटस्फोटात मात्र दंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली २९ वर्षीय फातिमा सना शेख सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. आमिर आणि फातिमा यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘दंगल’ सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिरसह तिची चांगलीच जवळीक वाढल्याची चर्चाही रंगल्या.
‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमासाठी आमिरच्या शिफारशीवरुनच फातिमाला सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. सततच्या चर्चांमुळे फातिमाने आमिर खानसोबत अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले होते. तर आमिरने यावर काहीच न बोलता मौनच बाळगणे पसंत केले होते. आता काय?… आगे आगे देखेंगे होता है क्या…