आज चला हवा येऊ द्या होणार ‘सैराट’
आपल्या झिंगाट गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना याड लावणा-या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेली आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली.
चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची टीम सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहे आणि यावेळी हा दौरा पोहोचला सोलापूर शहरात. त्यासाठी कारणही तसं विशेष होतं. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं गाव सोलापूर जिल्हयातीलच शिवाय या चित्रपटाचं अर्ध्यापेक्षा जास्त चित्रीकरण याच जिल्हयात झालं आहे. सोलापुरात सैराट आणि चला हवा येऊ द्या चे कलाकार एकत्र आले आणि त्यांनी विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू, फॅंड्री चित्रपटात जब्या आणि पि-या या भूमिका साकारणारे सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार, अभिनेत्री छाया कदम आणि निर्माते तथा झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने अशी फौज यात सहभागी झाली होती.
नागराज मंजुळे यांच्या फॅंड्री चित्रपटाची वाहवा सर्वच स्तरातून झाली याच चित्रपटावरून प्रेरित होऊन थुकरटवाडीच्या दिग्दर्शकाने बनविला एक चित्रपट पोल्ट्री ज्यामध्ये जब्या, पि-या आणि शालुची आगळी वेगळी लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. याशिवाय बाप की अदालातमध्ये आरोपींच्या पिंज-यात अजय-अतुल यांच्यासोबत काही धम्माल खेळ रंगणार आहेत तर पोस्टमन काकाने नागराजसाठी आणलेल्या पत्राने प्रेक्षक हळवेही होणार हे नक्की. या सोबतच अजय गोगावले यांच्या सुरांची जादूही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि ‘झिंगाट’ डान्सही बघायला मिळणार आहे. सैराटची चर्चा सध्या सर्वत्र आहेच आणि या चला हवा येऊ द्या च्या या दोन भागांनंतर ती अजुनच वाढणार आहे. येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून त्याचा आनंद घेता येणार आहे.