नव्या प्रवासात स्वत:ची गाठ सोडवणारा ‘जाऊंद्याना बाळासाहेब’
Movie Reviews : Jaundya Na Balasaheb 2016
गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन आणि गिरीशच्याच नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि सिनेमातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे सिनेखवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे.
या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात सिनेमाचे संगीत आहे.
Jaundya Na Balasaheb Marathi Movie Review
राजकीय पार्श्वभूमीवर आधारित अनेक मराठी चित्रपट आले आहेत. घरातील पार्श्वभूमी राजकीय असेल आणि पुढील पिढीला राजकारणाचा तो वारसा हक्क नकोय अशी गोष्ट मराठी जनता कदाचित पहिल्यांदाच अनुभवत आहे, असा अंदाज बांधायला हरकत नाही. राजकीय पार्श्वभूमी आणि मराठी चित्रपट असं गणित मांडल्यावर सर्वात पहिले उत्तर असते ‘जाऊंद्याना बाळासाहेब’.
‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटात ग्रामीण भागातील ‘बाळासाहेब अण्णासाहेब मारणे’ या तरुणाची कथा मांडण्यात आली आहे. ‘जाऊंदे’ या शब्दाच्या आधारावर बाळासाहेब आपले दैनंदिन आयुष्यातील गोष्टी करत आला आहे.
अण्णा (मोहन जोशी) राजकारणात असल्यामुळे बाळासाहेबांनी पण राजकारणात यावं अशी अण्णांची इच्छा तर असतेच. पण वडिलांची राजकारणात सत्ता असल्यामुळे बाळासाहेबाचा आणि संपूर्ण फॅमिलीचा गावात दरारा असतो. राजकारणात आपल्या पुढील पिढीने यावे अशी अण्णांची इच्छा असून पण बाळासाहेब त्यांच्या इच्छेची पर्वा करत नाही.
त्यांच्या अशा स्वभावामुळे वडील आणि मुलगा यांच्यामध्ये वाद होतो आणि स्वत:ला सिध्द करण्यासाठी बाळासाहेब घर सोडून जातात.
पण वडिलांचे काहीही म्हणणं किंवा मत असो आई (रिमा लागू) मात्र नेहमी बाळासाहेबांसोबत आणि त्यांच्या निर्णयासोबत सहमत असते.
बाळासाहेब घर सोडून गेल्यावर स्वत:चा शोध घेतात आणि या नव्या शोधात त्यांना मित्रांची (भाऊ कदम) , एका मार्गदर्शकाची (मनवा नाईक), बाल मैत्रिणची (सई ताम्हणकर) साथ मिळते. स्वत:चे कर्तुत्व दाखवून देण्यासाठी मनवा नाईक बाळासाहेबांना नाटक करायला सांगते.
कारण मनवाच्या मते, ‘बाळासाहेबांचा मित्र लेखक असतो आणि ‘बाळासाहेब’ असं नाव का आहे, का म्हणून एवढ्या आदराने नाव घ्यावं, असं काय कर्तुत्व केलंय ज्यामुळे ‘बाळासाहेब’ म्हणून तुम्हांला संबोधले जावे.’ आणि हाच विचार बाळासाहेबांना अस्वस्थ करतो.
आणि त्यानंतर स्वत:ला सिध्द करण्यासाठी बाळासाहेब नाटकाच्या तयारीला लागतात. पण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना हे कितपत पटेल? जेव्हा-केव्हा बाळासाहेब घरी जातील तेव्हा ते राजकारणात सहभाग घेतील का? बाळासाहेबाला जगण्याचं मर्म सापडतं का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ नक्की पाहा.