मित्रांनो!, सध्या छोट्या पडद्यावरील झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत डॉ. गिरीश ओक साकारत असलेल्या अभिजीत राजेलादेखील मराठी रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याआधीच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेनंतर ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.
या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी, शुभ्रा आणि सोहम या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अभिजीत राजेंची भूमिका साकारली आहे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी. गिरीश ओक यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
डॉ. गिरीश ओक यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते मुळचे नागपूरचे. त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची पदवी घेतली. काही वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंतर आपली आंतरिक आवड लक्षात घेऊन त्यांनी आपला मोर्चा अभिनय क्षेत्राकडे कडे वळवला. दैनंदिन मालिका, नाटकांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा पद्मश्री पाठक यांच्यासोबत विवाह झाला.
त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. मात्र काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री विभक्त झाले. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दुर्गा नावाची मुलगीही आहे.
गिरीश ओक यांनी सुरुवातीला दूरदर्शनच्या मालिकेत काम केले. मात्र त्यांना ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेचे त्यांनी दोन हजार पाचशे एपिसोड्स केले. ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यासारख्या अनेक मालिकेत त्यांनी काम केले. सध्या ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत साकारत असलेल्या अभिजितलादेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
गिरीश ओक यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या ‘आली लहर केला कहर’ या सिनेमात एक छोटी भूमिका साकारली होती. पण, ते फार चित्रपटात रमले नाहीत. ‘जसा बाप तशी पोरं’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘शिवरायांची सून ताराराणी’, ‘लावण्यवती’, ‘विश्वविनायक’, ‘सातच्या आत घरात’, ‘झुळूक’, ‘आम्ही असू लाडके’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘तानी’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.
आत्ताच्या मालिकांविषयी बोलतांना ते म्हणतात की, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि आत्ता ‘अग्गंबाई सुनबाई’ या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, मिळतोय याचा आनंद आहे. मुळात ६० वर्षांचा हिरो आणि ५५ वर्षांची हिरोईन साकारणे एक चॅलेंज होते. मी आणि आसावरीने हे चॅलेंज अगदी यशस्वीपणे पेलले. अभिजीत राजेंची भूमिका माझ्याकडे चालून आली आणि मी ती लगेच स्वीकारली. जणू माझ्यासाठीच ही भूमिका लिहण्यात आली होती, असे मला वाटते.”
“बायकोवर, गाण्यावर, जेवणावर प्रेम करणारा, सगळ्यांना सांभाळणारा तोच अभिजीत राजे. फक्त त्याचा रोल बदललाय. आता त्याने तो पैशासाठी नाही तर घरच्यांच्या समाधानासाठी काम करतोय आणि हा बदल त्याने स्वत:हून स्वीकारलाय, असेही त्यांनी सांगितले. ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये घरा बाहेरचा अभिजीत दिसला. ‘अग्गंबाई सुनबाई’मध्ये घराच्या आतला अभिजीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आता मी हाऊस हसबण्ड झालोय, असेही ते म्हणाले. ख-या आयुष्यातही मी अगदी अभिजीत राजेंसारखाच आहे. अगदी गाण्यांवर प्रेम करणारा, जेवणावर प्रेम करणारा, गमतीजमती करणारा, बाईकवर प्रेम करणारा. फरक एवढाच की, खºया आयुष्यात मी डॉक्टर आहे आणि मालिकेतला अभिजीत राजे शेफ आहे.