मित्रानो!, आपल्या संपूर्ण आयुष्यभर ज्या माणसाने उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला खळखळून हसविले. आपल्या भन्नाट गाण्यांच्या तालावर बेधुंद होऊन नाचविले आणि हे करत असतांनाच मराठी माणसाची अस्मिता जपली असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके सुपरस्टार, विनोदसम्राट दादा कोंडके यांच्या भोर तालुक्यातील इंगवली येथील जुन्या घराला नुकतीच प्रथमेश परब म्हणजेच रवी जाधवच्या टाईमपास मधील दगडूने भेट दिली आणि… त्या घराची अवस्था बघून तो सुन्न झाला.

सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत त्याने याकडे सर्व कलाप्रेमी रसिकांचे लक्ष वेधलेय. दादा कोंडके यांचे संबंधित नातेवाईक, मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व दिग्गज आणि दादांशी संबंधित राजकीय पक्ष व नेत्यांना त्याने एकच भावनिक प्रश्नं विचारलाय… “या घराचं संवर्धन खरंच इतकं अवघड आहे का?”


मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते-निर्माते दादा कोंडके Dada Kondke यांना कोण बरे विसरू शकेल? दादा कोंडके यांच्या नावावर सिनेमे चालत. त्यांचा हटके अभिनय, जबरदस्त कॉमिक टायमिंग म्हणजे अफलातूनच. आजही त्यांच्या या हटके अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेता प्रथमेश परब Prathamesh Parab यापैकीच एक. नुकतीच प्रथमेशने दादांच्या जुन्या घराला भेट दिली आणि त्या घराची अवस्था बघून तो सुन्न झाला. पोस्ट शेअर करत त्याने याकडे लक्ष वेधले.

दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर एक उद्विग्न पोस्ट लिहिली. ‘आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील? असा सवाल प्रथमेश परबने या पोस्टमध्ये केला आहे. विस्तीर्ण निळ्या आकाशाखाली दिसत असलेलं, हे जुनाट, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांचं आहे.

हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं,

खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का? ते सुद्धा अनेक ठिकाणी दादांनी करून ठेवलेल्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीज असतांना?. निदान राहत्या घराची तरी व्यवस्थित डागडुजी करून त्याचे नीट संवर्धन करून एका स्मरकासारखे हे घर दादांशी संबंधित लोक जतन करू शकत नाहीत का?

दादांबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण दिवस अपुरा पडेल. आणि अखंड महाराष्टाला दादा चांगलेच ठाऊक आहेत. दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी एका सामान्य कुटुंबात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे एक किराणा दुकान होते तसेच त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते.

दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे.  त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्या हा चित्रपट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला.

प्रथमेश बद्दल नवीन सांगायचे झाले तर,  प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा “टकाटक-२” चित्रपटात मुख्य भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करणार आहे.