अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणजेच, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मधील आपली सगळ्यांची लाडकी सई, या लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या सगळ्या आवडी पूर्ण करते आहे. त्याविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा;
१. लॉकडाऊनच्या काळात तू घरी बसून काय करते आहेस?मला नृत्याची खूप आवड आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. ‘झी युवा’वर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत माझ्या नृत्याची काहीशी झलक तुम्ही बघितली आहेच. ही आवड मी मनापासून जोपासते आहे. कंटाळा घालवण्यासाठी, मनावरील ताण हलका होण्यासाठी, नृत्य नेहमीच मदत करतं. त्यामुळे रोजचा थोडावेळ मी नृत्यकलेसाठी देते. माझी आवडती गाणी लावून मी मनसोक्त डान्स करते.
२. तुला स्वयंपाकाची सुद्धा आवड आहे. त्याविषयी काय सांगशील?अर्थात! मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. सईने थालीपीठ केलेलं तुम्ही मालिकेत पाहिलं असेल. पण, मला अजूनही तेवढं छान थालीपीठ करता येत नाही. त्यामुळे मी एकदिवस आईच्या मार्गदर्शनाखाली थालीपीठ बनवण्याचा सर्व केला. इतरही अनेक पदार्थ मी बनवते आहे. अनायसे घरी बसावं लागत असल्यामुळे, मी माझी स्वयंपाकाची आवड पूर्ण करून घेतेय.
३. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी लॉकडाऊनमध्ये मिळाली आहे. कुटुंबासोबत काय धमाल आणि मजा करते आहेस?घरी रोज आमचा कॅरमचा डाव रंगतो. सहसा मी, भय्या, माझी लहान बहीण इशू आणि बाबा असे चौघे मिळून कॅरम खेळतो. एकमेकांची थट्टामस्करी करणं, छान गप्पा मारणं, आणि सोबतीने रंगलेला कॅरमचा डाव यात वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही. पण, यानिमित्ताने कुटुंबासोबत बराच निवांत वेळ घालवता येतोय, याचा आनंद आहे.
४. तुझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना काय आवाहन करशील?मी माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी घरी राहून करते आहे. घरी बसून वेळ घालवण्याचे खूप मार्ग आहेत. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा घरी राहा, तुमच्या आवडीनिवडी जपा. घरच्यांसोबत वेक घालवा आणि अर्थातच त्यांची आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.