१ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९६० मध्ये याच दिवशी १९५६ च्या भाषावार प्रांतरचना आधारित राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे मुंबई प्रांताची विभागणी करुन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आज ६० व्या महाराष्ट्र दिनी आपण आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया…
महाराष्ट्रीयन लोकांचा सर्वसाधारण पोशाख : पारंपारिकरित्या महाराष्ट्रातील महिला साडी किंवा नऊवारी परिधान करतात. पैठणच्या प्रसिद्ध पैठणी साडीला पोशाखात विशेष स्थान असून शुभप्रसंगी पैठणी, नऊवारी आवर्जूनपणे नेसण्यात येते. आधुनिक काळातील महाराष्ट्रीयन महिला पाश्चिमात्य पोशाख जसे की स्कर्ट, जीन्स, टॉप्स घालणेही पसंत करतात. महाराष्ट्रीयन पुरुषांचा पारंपरिक पोशाख म्हणजे धोतर, विजार व फेटा. विविधरंगी फेटे, कुर्ते घालण्याला पुरुषमंडळी सणानिमित्त विशेष पसंती देतात. ग्रामीण भागात गांधीटोपी आवर्जून परिधान करण्यात येते. महाराष्ट्रीयन स्त्रिया विविध प्रकारचे दागदागिने घालून महाराष्ट्रीयन पेहराव पूर्णत्वाला नेतात. यात कोल्हापुरी साज,नथ, मंगळसूत्र व इतर दागिन्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील लोकांचा आहार: महाराष्ट्रीयन लोकांच्या आहाराची चव मुख्यत्वेकरुन सौम्य ते तिखट स्वरुपाची असून नारळ व चिंच वापरले जाते. आहारात प्रामुख्याने गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, पालेभाज्या, फळे, मासे-मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. उकडीचे मोदक, पुरणपोळी, बटाटावडा, कोल्हापुरी झणझणीत मिसळ व पावभाजी हे जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. सणांच्या वेळी देवाला दाखवण्यात येणा-या नैवेद्यात डाळ-भात, भाजी, पुरी व गोड पदार्थ यांचा समावेश असतो. मालवणी, कोल्हापुरी, वराडी अशा विविध खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात असून विविधतेत एकता पाहायला मिळते.
महाराष्ट्राची लोककला व संगीत : भारतीय शास्त्रीय संगीतात महाराष्ट्रातील कलावंतांचा वाटा वाखाणण्याजोगा आहे. पोवाडा, भारुड, गोंधळ या लोककला प्रकारांनी महाराष्ट्राला समृद्ध बनवलंय. कोल्हापुर, पुणे या शहरांनी भावगीत व नाट्यसंगीतात मोलाचे योगदान दिले आहे. लावणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. वारकरी मंडळींच्या योगदानामुळे महाराष्ट्रात भजन, कीर्तन व अभंगांची एक मोठी परंपरा आहे. मासेमारी समाजातील ‘कोळी नृत्य’ हे अतिशय प्रसिद्ध असून मासेमारी करतानाची विविध दृश्ये व प्रसंग नृत्यातून दर्शविले जातात.
मराठी साहित्य परंपरा: मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून मराठीतील सर्वात प्रथम साहित्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीला समजले जाते. साहित्य अधिकाधिक समृद्ध करण्यात त्याकाळी संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, रामदासस्वामी व गोरा कुंभार यांनी मोलाचे योगदान दिले. एकोणिसाव्या शतकातील साहित्य प्रगल्भ करण्यात बाळशास्त्री जांभेकर, गो.ग.आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, केशवसुत यांचा मोठा वाटा आहे. तर विसाव्या शतकात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, वि.स.खांडेकर, प्र.के.अत्रे, साने गुरुजी, विनोबा भावे, बहिणाबाई चौधरी, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, नरेंद्र जाधव या व अशा अनेक साहित्यप्रेमींचे योगदान महत्वाचे आहे.
अशा या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या देशात कीर्ती पावलेल्या राज्यात जन्माला येणं हे आपल्या सर्वांचेच सौभाग्य आहे!!
©Nikita Patharkar