एका शापित घराण्याची, असामान्य कथा असलेला, ‘तुंबाड’ हा चित्रपट लवकरच ‘झी टॉकीज’वर पाहायला मिळणार आहे. वाहिनीवरील ‘टॉकीज प्रीमियर लीग’ची सुरुवात या रहस्यमय चित्रपटाने होणार आहे. म्हणजेच, ५ एप्रिलला, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट ‘झी टॉकीज’वर पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने, चित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते सोहम शाह यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद;
१. ‘तुंबाड’ची निर्मिती करण्यासाठी बराच कालावधी लागला. प्रेक्षकांना अतिप्रचंड आवडेल, अशी एक स्पेशल कलाकृती आपण तयार करत आहोत, याची त्यावेळी कधी जाणीव झाली होती का?
नक्कीच! खरंतर, तुंबाडच्या निर्मितीला वेळ लागण्याचं मुख्य कारण तेच होतं. एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन, एक उत्तम चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न होता. या सिनेमाची निर्मितीप्रक्रिया २०१२मध्ये सुरु झाली, आणि तरीही चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी २०१८चे वर्ष उजाडावे लागले. अर्थात, एवढी मेहनत घेऊन, एक हटके आणि जबरदस्त चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो याचा मला आनंद आहे.
२. तुंबाड सिनेमाचे सर्वच स्तरावर खूप कौतुक झाले. याचं श्रेय तू कुणाला देशील? या चित्रपटाविषयीची कोणती प्रतिक्रिया तुझ्याकरिता सर्वाधिक महत्त्वाची आहे?
राजू हिरानी सरांना हा चित्रपट खूप आवडला. त्यांनी स्वतः या चित्रपटाचं खूप कौतुक केलं. ही कौतुकाची थाप माझ्यासाठी, एखाद्या पुरस्कारापेक्षाही अधिक मोठी आहे. प्रेक्षकांना चित्रपट पसंत पडला, ही एक हिट फिल्म ठरली याचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देईन. चित्रपटाचे छायांकन असो, कलाकारांचा अभिनय असो किंवा व्हीएफएक्सचा करण्यात आलेला उत्कृष्ट वापर; सर्वच क्षेत्रात टीमने प्रचंड मेहनत घेतली. चित्रपटाचे कथानक सुद्धा अत्यंत दर्जेदार होते. एक रहस्यकथा, भयपट आणि इतर अनेक पैलूंनी परिपूर्ण असा हा चित्रपट असल्याने, प्रेक्षकांना पसंत पडला.
३. दंतकथा, इतिहास, फँटसी याबरोबरीनेच, भारतीय समाजात स्त्रियांचे असलेले स्थान, अशा अनेक गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतो. हे सगळे विषय हाताळणे कसे शक्य झाले?
प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, त्यांना मनापासून आवडेल असा एक सिनेमा मला तयार करायचा होता. मूळ संकल्पनेला कुठेही धक्का लागणार नाही, ती कथा उत्तमप्रकारे हाताळली जाईल याची काळजी घेतली गेली. काहीवेळा, चित्रपटाची निर्मिती होत असताना, इतर अनेक गोष्टी आपोआप त्यात मिसळत जातात. तसंच काहीसं ‘तुंबाड’च्या बाबतीत झालं. चित्रपट निर्मितीच्या प्रवाहात इतर काही पैलू आपोआप हाताळले गेले.
४. ‘तुंबाड’ सिनेमासाठी निर्माता आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका तू पार पाडल्या आहेस. या कलाकृतीकडे तू कोणत्या नजरेने सर्वप्रथम पाहिले होतेस?
खरंतर, या दोन्हीपैकी कुठल्याच नजरेने नाही! कारण, कुठलीही स्क्रिप्ट हातात आल्यावर, मी प्रेक्षकांच्या नजरेतून आधी ती वाचतो. त्यानंतर अभिनयाबद्दल विचार करतो, आणि मगच माझ्यातील निर्माता त्या स्क्रिप्टचा गांभीर्याने विचार करतो. ‘तुंबाड’च्या वेळी सुद्धा वेगळं काहीच घडलं नाही. त्यामुळेच प्रेक्षकांना हवा तसा, दर्जेदार सिनेमा मी त्यांना देऊ शकलो.
५. हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा असं तुला वाटतं?
रविवार, ५ एप्रिल रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, ‘झी टॉकीज’वर ‘तुंबाड’ हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. मी म्हणालो त्याप्रमाणे, प्रेक्षकांना आवडेल अशी कलाकृती आम्ही तयार केलेली आहे. एक रहस्यमय भयपट आणि वेगळ्या धाटणीचा सिनेमा अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायलाच हवा. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे.