प्रेक्षकांची लाडकी वाहिनी असलेल्या ‘झी युवा’वर नुकताच ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा नवा कार्यक्रम सुरु झालेला आहे. १४ नर्तिकांच्या दिलखेचक अदा, अद्वैत दादरकरचं अप्रतिम सूत्रसंचालन आणि सोनाली कुलकर्णी व मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण यांच्या जोरावर या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली आहे. चाहत्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी घेऊन येण्याची परंपरा वाहिनीने या स्पर्धेतून सुद्धा जपलेली आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ची खासियत अशी की, संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातून सुद्धा आपल्या डान्सचा जलवा दाखवण्यासाठी एक स्पर्धक यात सहभागी झालेली होती.
ब्रेश्ना खान ही अफगाणिस्तानात जन्मलेली आणि पुढे युरोपातील जर्मनीत वाढलेली गुणी नर्तिका या स्पर्धेचा एक भाग होती.
शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी ब्रेश्ना भारतात आली. हिंदी भाषेवर सुद्धा उत्तम प्रभुत्व मिळवून, ती जणू इथलीच होऊन गेली. शास्त्रीय नृत्य शिकलेली असल्याने ती एक दर्जेदार नृत्यांगना झालेली आहे. तिच्या अफलातून डान्सच्या जोरावर तिने परीक्षकांसह प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकली आहेत. दुर्दैवाने, ही जबरदस्त डान्सर यापुढे या स्पर्धेचा भाग असू शकणार नाही. डेंग्यूमुळे आजारी पडलेली असल्याने ब्रेश्ना आपले सादरीकरण करू शकणार नाही. म्हणूनच तिला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. प्रेक्षकांची लाडकी असलेली ब्रेश्ना स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याने अनेकांचा हिरमोड झालेला आहे.