तेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत!
गेली अनेक वर्षे तेजस्विनी पंडित ममता फॉउंडेशन ह्या HIV बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी जोडली गेली आहे. हि भारतातली एकमेव संस्था आहे जी HIV बाधित लहान मुलांसाठीच हक्काचं घर आहे. ह्या संस्थेतल्या तीन स्त्रिया HIV बाधित मुलांसाठी अविरत काम करत असतात.
तेजस्विनी पंडित ह्या संस्थेसाठी गेले अनेक वर्ष काम करत आहे. केवळ आर्थिक सहाय्य करणे इथवर तेजस्विनीचे काम सीमित नाही. कामात कितीहि व्यस्त असली तरी देखील तेजस्विनी ह्या मुलांना वरचेवर भेटत असते. त्यांच्यासोबत चित्रपट पाहणे, त्यांना शॉपिंगला घेऊन जाणे , त्यांच्यासोबत लंच करणे यांसारख्या अनेक गोष्टी ती या मुलासांसाठी करते! आणि हे ती गेली अनेक वर्षे करत आहे आणि ह्या गोष्टीची तिने मीडियाला भनकहि लागू दिली नाही! पण ह्यावेळेस मात्र आपले काम लोकांसमोर आणले आहे. तिने या वेळेसचा ‘बालदिन’ ममता फॉउंडेशनच्या मुलांसोबत साजरा केला आणि त्याची एक छोटीशी व्हिडीओ क्लिप आपल्या सोशल मीडियावर टाकली.
तेजस्विनीला याबाबत विचारले असता तिने म्हटलं, “हि गोष्ट मीडिया समोर आणून त्याचा शो ऑफ करणे हे मला पटत नव्हते म्हणून मी आजपर्यंत ह्या बद्दल काहीच बोलले नाही. परंतु पुढे अनेकांनी समाजवल्यानंतर मी माझ्या या मुलांना व्हिडीओमध्ये घेऊन आले. ममता फॉउंडेशन हि एकमेव संस्था जी HIV बाधित मुलांसाठी काम करते, जी एक जोडपं स्वकष्टावर चालवत आहे. माझ्या द्वारे ह्या संस्थेला लोकांपर्यंत पोचवता येईल आणि इतर अनेक मदतीचे हात पुढे येतील, हा उद्देश ठेवून मी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. २०१७ चा हा बालदिन स्पेशल व्हिडीओ ह्या मुलांच्या आयुष्यात अनेक मदतीचे हात घेऊन येतील अशी अपेक्षा आहे.”
तेजस्विनीचा हा छोटेखानी बालदिन सोहळा नक्कीच फार वेगळा आहे. तिचा हा प्रयत्न ममता फॉऊंडेशनच्या मुलांच्या आयुष्यात नक्की चांगले दिवस आणेल, हि अपेक्षा आहे.