शारदा संगीत विद्यालयाची 'नव्वदी'

 

शारदा संगीत विद्यालयाची ‘नव्वदी’

मुंबईतील शारदा संगीत विद्यालय ही शास्रीय संगीत क्षेत्रातील एक अग्रेसर आगळी वेगळी संस्था आहे. आपल्या कार्याने केवळ जनमानसातच नाही तर मान्यवर कलाकार व इतर संस्थांच्या कौतुकास पात्र ठरलेली ही संस्था यंदा ९० वर्ष पूर्ण करत आहे. या संस्थेच्या नादब्रह्म मंदिर या वास्तूस याच वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहे. येत्या १३ जानेवारीला रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी  ५. ०० वाजता शारदा संगीत विद्यालयाचा वर्धापनदिन सोहळा पार पडला. उदघाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लावली होती. या संस्थेला यावर्षी ९० वर्ष पूर्ण होत असल्याने पदमभूषण उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां., पं. रामनारायण, पं. अरविंद पारीख व पं. यशवंत देव या ९० वर्षे वयावरील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

नादब्रम्ह मंदिर ही वास्तू पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचे स्मारक असून पंडितजींच्या शिष्या इंदिराबाई केळकर यांनी १९२७ मध्ये या विद्यालयाची स्थापना केली. इंदिराबाई केळकर यांची आपल्या गुरूंचे स्मारक बनवण्याची इच्छा त्यांचे मानसपुत्र व या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश नारंग यांनी पूर्ण केली. संगीत विद्यालयांमधूनही कलाकार निर्मिती शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध करून संस्थांतर्गत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या पं. पलुस्करांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे. या संस्थेची खासियत म्हणजे या संस्थेतील शिक्षक हे केवळ संगीत पदवीधर नसून उत्तम कलाकार आहेत, त्यामुळे संस्थेत शिकणारे विद्यार्थी कलेची आवड ठेवून शिकतात. या संस्थेत एकूण १५ पेक्षा जास्त शिक्षक असून १५ वर्षाहून अधिक काळ या संस्थेत टिकून आहेत. नियमित शिक्षकांव्यक्तिरिक्त डॉ. राम देशपांडे, पं. अरुण कशाळकर, पं. मुरलीमनोहर शुक्ल, पं तुलसीदास बोरकर, पं. सुधीर माईणकर, डॉ. शमा भाटे, डॉ. मंजिरी देव अशा प्रथितयश गुरूंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संस्थेकडून मिळत असते.

unnamed

 

संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता वार्षिक गुरुपोर्णिमेव्यक्तिरिक्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, तसेच विविध स्पर्धा व शिष्यवृत्यांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. “या संस्थेतील विद्यार्थी हा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला परिक्षेला बसवत नाही, तो आपल्या कलेत तयार झाला तरचं त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी आम्ही देतो”, असे या संस्थेचे अध्यक्ष सुरेश नारंग यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे. एक वेगळी ओळख मला या कार्यक्रमाने दिली, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी यावेळी सांगितले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तबलावादनाने तसेच पदमश्री  पं.उल्हास कशाळकर यांचे गायनाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

sharda sangeet vidyalaya

 

शास्रीय संगीताचा प्रसार तसेच प्रचार व्हावा, सर्व सामान्यांना शास्रीय संगीताची गोडी लागावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच उदयोन्मुख कलाकारांना व्यासपिठ मिळावे या दृष्टीने ही संस्था गुरुभक्ती, शारदा उत्सव, दुर्गा उत्सव, स्वर निनाद यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. विद्यालयाने संगीत शिक्षण क्षेत्रात जे मौलिक योगदानाबद्दल आयटीसी-एसआरए, हृदयेश आर्टस्, गोपीकृष्ण उत्सव समिती अशा अनेक मान्यवर संस्थांनी विद्यालयाचा गौरव केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here