‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा कार्यक्रम अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. स्पर्धकांचे उत्कृष्ट सादरीकरण आणि सेटवर होणारी धमाल, हे या लोकप्रियतेचे महत्त्वाचे कारण आहे. निवेदिका मृण्मयी देशपांडे आणि परीक्षक वैभव मांगले हे सुद्धा स्पर्धकांच्या बरोबरीने मजामस्ती करत आहेत, असे अनेकदा पाहायला मिळाले आहे. सावनी शेंडे सुद्धा या मजेत सहभागी होते. तिचा लाडका बनी, अर्थात ओंकार कानिटकर निरनिराळे उद्योग करून, मंचावर धुमाकूळ घालत असतो. वैभवकडून आगाऊपणा कमी करण्याबद्दल अनेकदा बोलणी ऐकून घेऊन सुद्धा, त्याची मस्ती सुरूच असते. या आठवड्यात सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या उपस्थितीत अशीच धमाल ‘युवा सिंगर’च्या मंचावर पाहायला मिळाली. स्पर्धेतील भावांची जोडी, दर्शन आणि दुर्वांकुर यांच्यात रंगलेली जुगलबंदी हे या भागाचे मुख्य आकर्षण ठरले. मन्ना डे आणि किशोर कुमार यांनी गायलेले, ‘एक चतुर नार’ हे गाणे या दोन भावांनी या आठवड्यात सादर केले. त्यांच्या परफॉर्मन्सची भट्टी इतकी उत्तम जमली, की त्यांना सर्वोत्तम सादरीकरणाचा ब्लास्ट देण्यासाठी परीक्षकांनी क्षणाचाही विलंब होऊ दिला नाही. या दोघांचेही कौतुक करण्यासाठी सादरीकरणानंतर परीक्षकांची जुगलबंदी झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. दर्शन आणि दुर्वांकुर कुलकर्णी या भावांच्या जोडीने, सर्वांची मने जिंकून घेतली. ठाण्याचा बनी, ओंकार कानिटकर यानेही अशाच उत्तम सादरीकरणातून सर्वांची वाहवा मिळवली. ‘युवा सिंगर’च्या कुटुंबातील या ससुल्याने, ‘ससा तो ससा’ हे गाणे सादर केले.
त्याने गाण्यात घेतलेल्या सुरेल जागा ऐकताना परीक्षक सुद्धा भारावून गेले होते. उत्तम गाण्यातून त्याने आपली छाप पाडलीच, शिवाय बप्पी दांच्या शैलीत मंचावर येत त्याने आपली मंचावरील मस्ती सुरु ठेवली. ‘केवळ त्यांच्यासारखे कपडे घालून उत्तम संगीत दिग्दर्शक होता येणार नाही’ हे परीक्षकांनी सांगितल्यावर, त्याने आपले संगीतातील ज्ञान सुद्धा सर्वांसमोर सादर केले. परीक्षक वैभव, सावनी व खास पाहुणे स्वप्निल, बेला यांनी गाऊन दाखवलेल्या ओळींचे नोटेशन त्याने योग्यप्रकारे ओळखून दाखवले. लहान वयात त्याची संगीताची समज बघून सारेजण अवाक झाले. अशीच, मजामस्ती आणि धमाल अनुभवण्यासाठी बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता, बघायला विसरू नका, ‘युवा सिंगर एक नंबर’ फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’वर!!!