मयूर वैद्य, हा सेलिब्रिटी मंडळींचा कोरिओग्राफर म्हणून आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर ११ डिसेंबर पासून बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो परिक्षकाच्या खुर्चीत बसलेला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा;

१. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तू पहिल्यांदाच ‘झी युवा’सोबत काम करत आहेस, त्याविषयी काय वाटतं? झी परिवारासोबात माझं नातं जुनं आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या निमित्ताने ‘झी युवा’ सोबत काम करायची संधी मिळते आहे. ही माझ्यासाठी नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. परीक्षकाची भूमिका मला इथे निभवायची आहे. या वाहिनीमुळे मला ही संधी मिळाली आहे. ‘झी युवा’ने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेऊन, प्रेक्षकांच्या मनात माझी एक खास जागा निर्माण करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन.

२. सोनाली कुलकर्णी तुझ्यासोबत परीक्षण करणार आहे. तिच्याविषयी काय सांगशील? फार पूर्वी मी सोनालीच्या एका डान्ससाठी कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर आम्ही एकत्र काम केलेले नाही. पण, आमच्यात खूप छान मैत्री झालेली आहे. आम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्रपणे एका स्पर्धेचे परीक्षण करत आहोत. आम्ही एका स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार असल्याने, त्याविषयीची उत्सुकता आणि आनंद मनात आहेच. आमचं मैत्रीचं नातं खूपच छान आहे. पण, परीक्षण करत असताना कधीतरी एकवाक्यता तर कधीतरी निराळे विचार असे अनुभव घ्यायला मिळतील. आम्ही एकत्र काम करणार आहोत याचा खूप आनंद आहे. परीक्षण करण्याव्यतिरिक्त खास काहीतरी प्रेक्षकांसाठी पेश करण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच असेल.

३. स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी कुठले मुद्दे तुझ्यादृष्टीने महत्त्वाचे असतील? स्पर्धकांच्या परीक्षणात मी फारच बारकाईने लक्ष घालणार आहे. या तारकांना, आजवर प्रेक्षकांनी निराळ्या भूमिकेत पाहिलेले आहे, पण डान्सिंग क्वीन म्हणून त्या या स्पर्धेत सहभागी होतील, तेव्हा त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पाहायला मिळावे अशी अपेक्षा असणार आहे. त्यांनी निवडलेली थीम ही नृत्याला योग्य असणे गरजेचे आहे. या थीमला योग्य अशी हेअरस्टाईल, वेशभूषा या गोष्टी सुद्धा असणे माझ्यादृष्टीने आवश्यक आहे. वेगवेगळ्या एपिसोड्समधील सादरीकरणात कुठेही साधर्म्य असू नये याची काळजी स्पर्धकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट करत असताना, नृत्याला न्याय दिला गेला पाहिजे. नृत्य सादर करत असताना त्यात सहजता असली पाहिजे, अशी सुद्धा माझी अपेक्षा आहे.

४. या कार्यक्रमाची संकल्पना खास आणि वेगळी आहे. त्याविषयी तुझे मत काय आहे? या कार्यक्रमाची संकल्पना खरोखरंच खूप वेगळी आहे. नृत्याच्या स्पर्धेला एका वेगळ्या स्तरावर पोचवण्याचा ‘युवा डान्सिंग क्वीन’चा प्रयत्न असेल. काही भागांमध्ये स्पर्धक, परीक्षक आणि सूत्रसंचालक वेगवेगळ्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात, सगळीच गुपितं मी आत्ता सांगणार नाही. कार्यक्रम प्रेक्षकांनी पाहावा आणि त्याचा मनमुराद आनंद लुटावा. नृत्याबरोबरच इतर अनेक गोष्टींची पर्वणी सगळ्यांसाठी असणार आहे. ‘झी युवा’ने ही खास मेजवानी प्रेक्षकांसाठी आणलेली आहे. अद्वैत दादरकर सुद्धा या कार्यक्रमात धमाल आणणार आहे, यातही शंका नाही. अफलातून मनोरंजन करणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अवश्य पाहावा, हे मी आवर्जून सांगेन.