नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या आवाजाने गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्याबरोबर सुमधुर गाण्यांची आणि दिलखलास गप्पांची ‘मेहफिल’ लवकरच आपल्याला झी युवा या वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सोमवार ९ डिसेंबरपासून सुरू होणार असलेली ‘मेहफिल’ आठवड्यातून दोनदा म्हणजे सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता झी युवावर प्रक्षेपीत होईल . यात क्रांती रेडकर ही लोकप्रिय अभिनेत्री या शो ची होस्ट असून ती साधनाजींशी संवाद साधेल. साधना सरगम यांचा चित्रपटगीतांचा तीन दशकांचा प्रवास त्यामागील कहाण्या याबद्दल साधनाजीकडून ऐकायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमाच्या घवघवीत यशानंतर, ‘झी युवा’ वाहिनी हा नवाकोरा, अफलातून सिंगिंग रिऍलिटी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. तरीही या कार्यक्रमाला स्पर्धेचे कुठलेही स्वरूप देण्यात आलेले नाही. दर आठवड्यात, संगीत क्षेत्रातील सेलिब्रिटी या मैफिलीत आपल्या भेटीला येणार आहे. दरवेळी थीम सुद्धा नवी असणार आहे. या भागात साधनाजींबरोबर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र , जुईली जोगळेकर , राहुल सक्सेना , अभिजीत कोसंबी , अलोक कातदरे , अमोश मोहिते यांचीही सुमधुर गाणी पहायला मिळतील .

या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात नव्वद च्या दशकात अनेक चित्रपटांमधील गाणी गाणाऱ्या साधना सरगम यांच्या गाण्यातील जादू अनुभवण्याची संधी ‘झी युवा’वर मिळणार आहे. विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित साधनाजी, त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या आवडीची निरनिराळी गाणी या मंचावर सादर करतील. सोमवारी आणि मंगळवारी रात्री जेवणाच्या वेळी रंगणार असलेली ही मेहफील , दिवसभराच्या थकव्याचा ‘स्ट्रेस बस्टर’ ठरेल, हे मात्र नक्की! साधनाजींचे सारे चाहते, मेहफीलच्या या भागाचा मानापासून आनंद लुटतील.

‘झी युवा’ वाहिनीवरील या मेहफिल मध्ये सहभागी झालेल्या साधना सरगम यांनी सांगितले की , ” ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘ मेहफिल’ सारख्या संगीतावर आधारित उत्कृष्ट कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा खरंच आनंद आहे. पहिल्या भागासाठी मला विचारले गेले हा मी माझा सन्मान समजते.या मंचावर माझी जुनी लोकप्रिय गाणी गात असताना, माझ्या अनेक आठवणीही ताज्या झाल्या. माझी निवडक आवडती गाणी मी या कार्यक्रमाच्या द्वारे प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहेत. झी युवाचे प्रेक्षक या गाण्यांचा मनमुरादपणे आनंद लुटतील, याची मला खात्री आहे.”