‘ती अँड ती’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, येत्या रविवारी ‘झी टॉकीज’वर होणार आहे. या थोड्या हटके सिनेमाच्या निमित्ताने, अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्याशी साधलेला हा संवाद…
 
१. चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
 ‘ऍरेंज मॅरेज’मधून आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे, असं मानणारी एक अल्लड तरुणी मी या चित्रीपटात साकारली आहे. तिचा नवऱ्यावर खूप विश्वास आहे. हनीमूननंतर सुद्धा नवरा-बायकोच्या प्रेमळ नात्यात हवी तेवढी जवळीक निर्माण झालेली नसली, तरीही तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे. आपला नवरा सुद्धा या नात्यात पुरेसा गुंतला गेला आहे याचा तिला विश्वास वाटतो आहे. तिच्या नकळत घडणाऱ्या इतर गोष्टींविषयी ती अनभिज्ञ आहे.
 
२. सहकलाकारांसोबत काम करत असतानाचा अनुभव कसा होता?
सोनाली आणि मी आधीपासूनच छान मैत्रिणी आहोत. त्यामुळे काम करणं सोपं गेलं. शूटिंग आणि मजा या दोन्ही गोष्टी सुरू होत्या. मृणाल कुलकर्णी या उत्तम दिग्दर्शिका आहेत. पुष्करसारख्या कलाकारासोबत काम करणं हीदेखील आनंदाची बाब होती. सगळ्यांशी छान जुळून आल्यामुळे चित्रीकरण करण्याची मजा अनुभवता आली. 
 
३. परदेशात चित्रीकरण करण्याच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगशील?
लंडनमधल्या वातावरणाचा अंदाज कधीच बांधता येत नाही. त्यामुळे तिथे चित्रीकरण करणं, हे आव्हानात्मक होतंच. पण, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे, सहकलाकारांशी जुळवून घेता आलं, की चित्रीकरणादरम्यान येणारं आव्हान सहज पेलता येतं. 
४. चित्रपटाचा एखादा मजेशीर किस्सा सांगशील का?
रात्रभर घराबाहेर असलेला नवरा, खूप दारू पिऊन घरी परत येतो, असा एक प्रसंग चित्रीत करायचा होता. अभिनयात नैसर्गिकता यावी, म्हणून पुष्करने खरोखरच थोडी दारू प्यायची ठरवली होती. या प्रसंगात, त्याचा संपूर्ण भाग चित्रित होईपर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं. पण, माझे क्लोज शॉट्स घ्यायची वेळ आली, तोवर नशेमुळे पुष्करला झोप येऊ लागली. हा प्रसंग शूट करताना आमची सगळ्यांची बरीच तारांबळ उडाली होती. जवळपास २१ तास आम्हाला हा प्रसंग चित्रित करण्यासाठी घालवावे लागले. पण, ही मेहनत वाया गेलेली नाही. उत्तमरित्या ओरसंग चित्रित झालेला आहे. ‘झी टॉकीज’वर होणाऱ्या ‘ती अँड ती’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.