लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाने मंत्रमुग्ध करण्यासाठी झी टॉकीज ने आणलेल्या टॉकीज प्रिमियर लीगची दमदार घौडदौड सुरु आहे .’तुंबाड’ व ‘बोला अलख निरंजन’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद टॉकीज प्रीमियर लीग मध्ये मिळाला आहे. आता येत्या रविवारी म्हणजेच १९ एप्रिल रोजी दुपारी १२ आणि संध्या ६ वाजता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे ‘हंपी’. हंपी हे कर्नाटकातील एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे .तुंगभद्रा नदीच्या तीरावर वसलेल्या हंपी नगरीमध्ये असंख्य मंदिरे प्राचीन काळात उभारलेली आहेत. त्या मंदिरांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. अशा या ऐतिहासिक पर्यटनस्थळा कथेच्या केंद्रस्थानी ठेवून हा चत्रपट आपली वाटचाल करतो.

इशा ही मुलगी हंपीला एकटीच आलेली आहे. ती खरतर आपली मैत्रिण गिरिजा (प्राजक्ता माळी ) हिच्याबरोबर येणार होती. परंतु गिरिजा आयत्यावेळी न आल्याने इशा एकटीच हंपीला येते. तुमच्या आमच्यासारखीच इशा (सोनाली कुलकर्णी) तिच्या आयुष्यातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी हंपी गाठते. यावेळी तिची हंपीमध्ये कबीर (ललित प्रभाकर) ची ओळख होते . कबीर हा मनमोकळा, भ्रमंतीबाज असतो तर इशा मनातून काहीशी निराश आहे. इशाला तिच्या आईवडिलांच्या विभक्त होण्याचा त्रास होत असतो.या कारणांमुळे तिचा मैत्री, प्रेम या गोष्टींवरुन विश्वास उडालेला असतो. मात्र तीची आणि कबीर ची मैत्री होते तसतसे तिच्या मनात त्याच्या बद्दल हळुहळू एक आत्मीयता निर्माण होते. कबीर आपल्या वागण्यातून तिला हा विश्वास निर्माण करून देतो की जगात प्रेम असते, मैत्रीचे बंध असतात.

प्राजक्ता माळी ही गिरीजा च्या भूमिकेत आहे. ती एका मासिकामध्ये लेख लिहिते. तिने इशाच्या जिगरी मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. आर रणजीत या रिक्षाचालकाच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव आहे.आपल्या विनोदी शैलीत तो सर्वांना हंपी ची सफर घडवतो.चित्रपटाची पटकथा आणि संवाद अदिती मोघे हिने लिहिले असून दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे.

हंपी चित्रपटातील गीते वैभव जोशी, ओंकार कुलकर्णी यांनी लिहिलेली आहेत तर राहुल देशपांडे आणि रुपाली मोघे यांनी चित्रपटातील सुरेल गाणी गायली आहेत. चित्रपटाला नरेंद्र भिडे, आदित्य बेडेकर यांनी संगीत दिले असून पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. सुरेल संगीत.उत्कृष्ठ छायाचित्रण,उत्तम दिग्दर्शन, साजेशी वेशभूषा या साऱ्याच अंगाने “हंपी” चित्रपट चांगलाच जमून आला आहे.

विशेष करून तरुण वर्गाने व ज्यांना भटकंतीची आवड आहे, प्रेमावर विश्वास आहे त्यांनी हा चित्रपट न चुकता पाहायला हवा. ऐतिहासिक “हंपी” या पर्यटनस्थळाची सफर घडवणारा “हंपी” पाहायला विसरू नका येत्या रविवारी म्हणजेच १९ एप्रिल रोजी दुपारी १२ आणि संध्या ६ वाजता फक्त आपल्या ” झी टॉकीज” वर.