‘झी टॉकीज’ ही मराठी चित्रपट वाहिनी ‘गोल गोल गरा गरा’ हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. स्त्रियांचा अत्यंत तिरस्कार करणाऱ्या दादा दांडेकर या व्यक्तीची आणि दादांच्या तीन मुलांची ही विनोदी कथा आहे. यात बाळ दांडेकर या दादांच्या शेंडेफळाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक देशमुख याच्याशी मारलेल्या खास गप्पा;

१. ‘गोल गोल गरा गरा’ सिनेमातील तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांग.या चित्रपटात मी ‘बाळ दांडेकर’ ही भूमिका साकारतो आहे. दादा दांडेकरांच्या तीन मुलांपैकी हे शेंडेफळ आहे. पुढच्या पिढीतील असल्यामुळे, तो थोडा मॉडर्न आहे. शहरात वावरल्यामुळे त्याला नव्या जगाची जाण आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात आणि नियमित आयुष्यात शहरी मानसिकतेचा प्रभाव जाणवतो.याआधी मी विनोदी भूमिका केलेली नाही. त्यामुळे बाळची भूमिका साकारण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली आहे.

२. गिरीश ओक या अभिनेत्यांसह काम करण्याची संधी तुला ‘झी टॉकीज’ मुळे मिळाली आहे. त्याविषयी काय सांगशील?कुठल्याही नव्या चित्रपटात काम करायला मी खूप उत्सुक असतो. नव्या टीमसोबत काम करण्याची संधी त्यामुळे मिळत असते. ‘गोल गोल गरा गरा’मधील कलाकारांपैकी, गिरीश सरांसोबत मी आधी एकदा काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडीफार माहिती होती. विनोदी सीन करत असताना कलाकाराला मजा आलेली असेल, तर प्रेक्षक सुद्धा निश्चितपणे त्या सीनचा आनंद घेतात, ही शिकवण मला गिरीश ओक सरांकडून मिळाली आहे. या चित्रपटाच्या टीममध्ये मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळे सगळ्याच कलाकारांच्या अनुभवाचा मला फायदा झाला.

३. तुझी भूमिका आणि तुझं आयुष्य यात काही साधर्म्य आहे, असं तुला वाटतं का?बाळ दांडेकर आणि प्रतीक देशमुख यांच्यात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. पण, खरंतर यामुळेच मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली. एक नवी आणि वेगळी व्यक्ती स्क्रीनवर उभी करण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली.बाळ नेमका कुठल्या परिस्थितीत लहानाचा मोठा झाला आहे, ते समजून घेऊन त्यानुसार हे पात्र साकारायचे होते. अभिनेत्याची अशा भूमिकांमध्ये खरी परीक्षा असते. अर्थात, विविध भूमिका साकारत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगण्याची संधी आम्हा कलाकारांना मिळत असते. म्हणूनच, अशी वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मला आवडतं.

४. प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा?रविवार १५ मार्च रोजी, हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक नवा कोरा चित्रपट, तिकिटाचे पैसे खर्च न करता, घरबसल्या बघण्याची संधी ‘झी टॉकीज’ने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून, या विनोदी चित्रपटाचा आस्वाद घेणे शक्य आहे. त्यामुळे ही संधी प्रेक्षकांनी अजिबात सोडू नये, व चित्रपट नक्की पाहावा.