कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा, अनेक कुटुंबाना एकत्र आणणारा आणि घराघरातील वहिनींना पैठणीचा बहुमान देणारा हा कार्यक्रम लवकरच १५ वर्षे पूर्ण करत आहे.

या कार्यक्रमाची आजवर अनेक पर्व झाली. वेगवेगळ्या स्वरूपात हा पैठणीचा खेळ प्रेक्षकांच्या भेटीस आला असून नेहमीच या कार्यक्रमाची रंगत वाढली आहे. नुकतंच तमाम वहिनींसाठी होम मिनिस्टरच ‘अग्गबाई सासूबाई’ हे पर्व सादर होतंय. सासू – सुनेच्या नात्यातील गोडवा या पर्वातून आदेश बांदेकर उलगडतात. पण आता याच पर्वाचा एक खास भाग आदेश बांदेकर यांच्या घरीच चित्रित होणार आहे. आदेश बांदेकर यांच्या सौ अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि आदेश भावोजींचं संपूर्ण कुटुंब या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या भागात पैठणीचा खेळ भावोजींच्या घरीच रंगणार आहे. त्यामुळे हि सर्व धमाल पाहायला विसरू नका शुक्रवारी १३ सप्टेंबर संध्याकाळी ६ वाजता १ तासाच्या विषेश भागात फक्त आपल्या झी मराठीवर.