प्रख्यात गायक अभिजीत भट्टाचार्य याने बराच काळ मीडियापासून दूर राहिल्यानंतर नुकतेच पुनरागमन केले आहे. अलीकडेच तो इंडियन आयडॉलच्या एका एपिसोडमध्ये दिसला. तो एपिसोडही वादग्रस्त झाला. आता त्याने त्याच्या एका मुलाखतीत अक्षय कुमारविषयी एक वक्तव्य केलेले आहे. या मुलाखतीत अभिजीतने सांगितले की त्याने अक्षय कुमारला स्टार बनवलं. अन्यथा पूर्वी लोक त्याला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती म्हणायचे.
इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने शाहरुख खान आणि सुनील शेट्टी यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, “मी फक्त स्टारसाठीच गाणे गाण्यासाठी बनलोय. सामान्य ऍक्टर साठी नाही. मी कितीही चांगलं गाणं म्हटलं तरी, जर समोरचा माणूस स्टार नसला तर सर्व निरुपयोगी आहे. एका बाजूला शाहरुख खान आहे तर दुसरीकडे सुनील शेट्टी. एसआरके हा स्टार आहे. तो क्लास आहे. आणि तो बोलतांना हे कायम जाणवते.
त्याचवेळी सुनील शेट्टींसोबत एक अँग्री इमेज संबंधित आहे. सुनीलसाठी जेव्हा जेव्हा एखादे गाणे बनवले जाते तेव्हा ते एकदम रांगडे ठेवले जात असे. पण मी मात्र सुनील आणि शाहरुख दोघांसाठीही गाणे गायलेय. माझी जी गाणी या दोघांवर चित्रीत करण्यात आली, ती, सर्वच सुपरहिट होती.
पण जेव्हा अक्षय कुमारचा उल्लेख झाला तेव्हा मात्र त्याचा स्वर कडवट झाला. अक्षयबद्दल बोलताना अभिजीत म्हणतो-
“माझ्या सुपरहिट गाण्यांनी अक्षय कुमारला स्टार बनवलं. जेव्हा त्याला लाँच केले गेले तेव्हा तो स्टार नव्हताच. यापूर्वी त्याला फिल्म इंडस्ट्रीत ‘गरीब लोकांचा मिथुन चक्रवर्ती’ म्हटले जात असे. अगदी तसेच जसे, मिथुनला ‘गरीबांचे अमिताभ बच्चन’ म्हटले गेले.
परंतु गीतसंगीत इतके शक्तिशाली आहे की ते कोणत्याही सामान्य अभिनेत्यास स्टार बनवते. ‘खिलाडी’ नंतर अक्षय स्टार झाला. पुढे त्यांच्या अनेक चित्रपटांना ‘खिलाडी’ असेही नाव देण्यात आले. माझा आवाज या सर्व लोकांना अगदीच अनुकूल आहे. हे लोक अभिनेते होते, परंतु माझ्या गाण्यांनी मात्र त्यांना सुपरस्टार केले. ”
आजच्या तारखेला अक्षय कुमारला भारतातील सर्वात मोठ्या स्टारांपैकी एक म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पण ९०च्या दशकात अभिजीतने त्यांच्यासाठी बरीच गाणी गायली, जी हिट होती. ‘खिलाडी’ मध्ये त्यांनी ‘वादा रहा सनम’, ‘खुद को क्या समझती है’ आणि ‘क्या खबर थी जाना’ अशी गाणी गायली. ‘खिलाडी’ हा १९९२ सालचा पाचवा सर्वाधिक विक्री होणारा म्युझिक अल्बम होता. मात्र असे असले तरी,आपण एखाद्याच्या यशामध्ये जर हातभार लावत असलो तरीही, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अपशब्द बोलण्याचा परवाना मात्र मिळत नाही. हे अभिजीतसह सर्वांनीच लक्षात ठेवायला हवे असे वाटते.