मित्रांनो!, आपण सर्वजण कधी ना कधी एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलात भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेलो असणारच… म्हणजे बहुतेकदा जातोच. घरचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपण हॉटेलमध्ये जातो. तिथे आपलं जेवण झाल्यानंतर वेटर बिल आणून देतो आणि बिल चुकतं केल्यानंतर सवयीने बहुदा वेटरला टिप दिली जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? ही पद्धत मुळात कशी सुरू झाली? चला तर जाणून घेऊयात…

रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर बिल चुकतं केलं की वेटरला टिप देणं तुम्हाला कुणी शिकवलं? असं जर विचारलं तर तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? पण यामागे एक इतिहास आहे. वेटरला टिप देण्याची पद्धत सध्याच्या पिढीला चित्रपट, टेलिव्हिजन, मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांकडून कळाली असेल. आपल्याला मिळालेल्या सेवेचा मोबदला म्हणून आपण काही आर्थिक बक्षीस स्वरुपात वेटरच्या कामाचं कौतुक करतो, अशी ही पद्धत आहे.

पण ही पद्धत नेमकी कुणी सुरू केली? रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर आपल्याला सेवा देणाऱ्या वेटरला टिप देण्याची पद्धत इंग्रजांनी सुरू केली. १६०० साली या पद्धतीला सुरुवात झाली असं सांगितलं जातं आणि याच काळात इंग्रजांनी भारतात पाऊल टाकलं होतं. इस्ट इंडिया कंपनीची स्थापना याच दशतकात झाली होती.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार इंग्रजांच्या मोठमोठ्या महालांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली सेवा दिल्याच्या मोबदल्यात पैसे देण्याची सुरुवात झाली. कर्मचाऱ्यानं केलेल्या कामाचं कौतुक म्हणून इंग्रजांनी या पद्धतीला सुरुवात केली. त्यानंतर ही एक सवयच होऊन बसली.

पण अमेरिकेत मात्र यामागची वेगळीच गोष्ट आहे. फूटवूल्फ या वेबसाइटच्या माहितीनुसार अमेरिकेत टिप देण्याची सुरुवात १८ व्या शतकात झाली असं सांगतात. न्यूयॉर्कच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधील प्राध्यापक मायकल लिन यांच्या माहितीनुसार अमेरिकेत टिप देण्याच्या पद्धतीची सुरुवात उच्च वर्ग म्हणजेच श्रीमंत वर्ग आपली श्रीमंती दाखविण्याच्या उद्देशातून टिप देऊ लागला. समाजातील हा श्रीमंत वर्ग यातून आपल्या आर्थिक प्रबळतेचं दर्शन घडवायचा.

स्वत: उच्च विद्या विभूषित आणि श्रीमंत दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांना टिप देण्याची पद्धत सुरू झाली. विशेषत: मद्यपान करणारे श्रीमंत व्यक्ती त्यांना वेटरकडून मिळणाऱ्या सेवेच्या मोबदल्यात टिप देऊ लागले होते. विशेष म्हणजे, टिप देण्याची पद्धत बंद करण्यासाठीही प्रयत्न केले गेले होते.

१७६४ साली जेव्हा संपूर्ण ब्रिटनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यास सुरुवात करण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांना टिप देण्याची पद्धत संपुष्टात आणण्यासाठीचे प्रयत्न झाले होते. यावरुन लंडनमध्ये खूप मोठा वादही उफाळून आला होता.

जॉर्जियामध्ये त्यावेळी एक अँटी-टिपिंग सोसायटी ऑफ अमेरिकेची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वॉशिंग्टनसहीत ६ अमेरिकी राज्यांनी टिपिंग विरोधी कायदा संमत केला होता. दरम्यान १९२६ साली अमेरिकी राज्यांनी टिपिंग विरोधी कायदा रद्द देखील केला. टिप देणं ही ग्राहकाच्या इच्छेवर आधारीत असतं.

यासाठी तुम्ही ग्राहकावर कोणतीही जबरदस्ती करु शकत नाही. यातही जेव्हा रेस्टॉरंट आणि हॉटेल्सकडून ग्राहकांच्या बिलात Service Tax सेवाकर जोडणं सुरू करण्यात आलं तेव्हा टिप देण्याचं प्रमाण खूप कमी झालं. तरीही आज टिप देणं हा एक स्टेटस सिम्बॉल मानले जाते. असो…