विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन
आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा देता-देता चुकूनच मनोरंजन क्षेत्राकडे वळला. वडील पीएसआय असल्यामुळे घरातलं वातावरण तसं सोशल सर्व्हिसेसकडे झुकणारं होतं पण प्रितमला एक वेगळंच जग खुणावत होतं. अंगीभूत कलागुणांना वाव मिळणाऱ्या या चंदेरी-सोनेरी दुनियेचे आकर्षण त्याला गप्पा बसू देत नव्हतं.

छोट्याशा गावातून आल्यामुळे लोकांमध्ये मनोरंजन क्षेत्राविषयी असणाऱ्या गैरसमजांनी प्रितमलाही एक ना अनेक निराशाजनक सल्ले दिले पण प्रितम हरला नाही त्याने या क्षेत्राचा अभ्यास करायचं ठरवलं. ‘सुम्मी,’ ‘रोकम’, ‘मंथन’ यांसारख्या अगणिक पारितोषिक विजेत्या शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या ज्यामुळे प्रितमचा आत्मविश्वास वाढला. अनेक दर्जेदार चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणारा प्रितम आता ‘खिचिक’ हा चित्रपट घेऊन येत आहे. २० सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘खिचिक’च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत…

‘खिचिक’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तू स्वतंत्रपणे लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहेस त्याबद्दल काय सांगशील? गेली ४/५ वर्ष मी मराठी मनोरंजन क्षेत्रात अगदी झपाटल्यासारखा काम करतोय पण स्वतंत्रपणे लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी आज ‘खिचिक’च्या निमित्ताने मला सचिन अनिल धकाते यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन. केवळ इतकंच नाही तर मी ‘गजू’ नामक एक लहान भूमिकासुद्धा या चित्रपटात साकारली आहे. माझ्या कामावर त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही.

या क्षेत्रात येण्याआधीपासूनच अगदी लहानपणापासून एक विषय माझे लक्ष वेधून घेत होता. तोच विषय मी मोठ्या पडद्यावर मांडला आहे. या चित्रपटाची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब.या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.मी स्वतः त्यांच्या पाड्यांत जाऊन राहिलो. संस्कृती, जीवनशैली आणि त्यांच्या व्यवसायाची इतंभूत माहिती गोळा केली. ‘खिचिक’ दिग्दर्शित करताना आलेल्या अनेक अनुभवांची शिदोरी मला कायम उपयोगी पडेल अशीच आहे.

‘खिचिक’ म्हणजे नेमकं काय… कथा काय आहे?
मी आधीच जसं म्हटलं ही एका समाज बद्द्ल आणि त्यांच्यात असणाऱ्या रूढी-परंपरांवर आधारित आहे. माझ्या गावातल्या घरालागूनच असणाऱ्या आमच्या शेतानजीकच ही जमात राहते. त्यांचा मूळ व्यवसाय चोरीमारी करणं हेच आहे. पण ही चोरी जरा आगळीच आहे. चोरून आणलेलं धन पावन होण्यासाठी त्यांना एक विधी करावी लागते. ती विधी केल्याशिवाय ते धन त्यांना पावन होत नाही. काय आहे ती विधी हे तुम्ही प्रत्यक्ष चित्रपटातच पाहावी. ‘खिचिक’ हा एक सामाजिक चित्रपट असून तूम्ही सहकुटुंब पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक खिचिक असतोच. नात्यांतली गुंतागुंत सोडवणारा ‘खिचिक’ नावाप्रमाणेच हटके आहे एवढं मात्र नक्की.

चित्रपटातील कलाकारांविषयी काय सांगशील?
‘खिचिक’मध्ये महत्त्वाच्या भूमिकांत सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, रसिक चव्हाण, पॉला एल.मॅकग्लेन, शिल्पा ठाकरे, सुदेश बैरी यांसारखे अनेकजण प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवतील. ‘खिचिक’साठी जमलेली नामांकित कलाकारांव्यतिरिक्त बरीचशी इतर मंडळी ही माझ्या ‘ऍक्ट प्लॅनेट’ ऍक्टिंग अकॅडेमी मधली आहेत. साधारण चार वर्षांपूर्वी मी पुण्यात चालू केलेली माझी ही अकॅडेमी उत्तोमोत्तम कलाकारांचे टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला नव-नवीन कलाकारांच्या अभिनयकौशल्याद्वारे संपूर्ण चित्रपटामध्ये एक फ्रेशनेस दिसेल.शूटिंगदरम्यान घडलेला एखादा गमतीशीर किस्सा घडला किंवा काही अडचणी आल्या का?
गमतीशीर म्हणावा का.. माहित नाही पण थ्रिलिंग किस्सा घडला मात्र खरंच.

आम्हाला कथानकाप्रमाणे एक सीन स्मशानभूमीत शूट करायचा होता. त्यासाठी आम्ही आमचं शूटिंग संध्याकाळी ५ पर्यंत संपवलं आणि रात्री ८ च्या पुढे स्मशानाचा सिन लावला होता. त्या दिवशी नेमकी आमावस्या होती हे आमच्या ध्यानीमनी ही नव्हते. आर्ट दादांनी सेट लावलेला सगळे कलाकार उपस्थित होते. अनिल धकाते जे प्रमुख भूमिकेत होते त्यांवर तो सीन शूट होणार होता. अचानकच कुत्रे भुंकू लागले. सहसा कधी शूटिंग दरम्यान कुत्रयांनी त्रास दिलेला मला तरी आठवत नव्हता. आमचे साधारण २ तास त्यांना हाकलण्यात-गप्प करण्यात गेले. शूट कॅन्सल करता येणं शक्यच नव्हतं त्यामुळे आम्ही थोड्यावेळाने तो सीन शूट केला आणि ते ही तीन खऱ्या-खुऱ्या प्रेतांसमवेत. ही गोष्ट आर्ट दादा आणि माझ्याशिवाय कुणालाच माहित नव्हती. कहर म्हणजे जहाल वास्तव दिसावं अशी कथानकाकाची मागणी असल्यामुळे त्या प्रेतयात्रेद्वारा ठेवण्यात आलेलेच जेवण मी अनिल धकातेंना खाऊ सुद्धा घातलं. त्यामुळे हा सीन अक्षरशः अंगावर येतो. अनिल धकाते यांच्याशिवाय मात्र हे शक्यच नव्हतं. त्यांच्या अभिनयाला तोड नाही.चित्रपटादरम्यानची एखादी अविस्मरणीय घटना?

पहिल्या-वाहिल्या प्रोजेक्ट्सची नशाच निराळी असते. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी बेहेत्तर पण तडजोड होता काम नये. हीच गोष्ट माझ्या डोक्यात सतत असल्यामुळे चित्रपटाचा शूटिंग ८० टक्के आउटडोअर होतं. पुण्याच्या तुळशीबाग, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड यांसारख्या गजबजलेल्या परिसरात शूटिंग करणं खूप कठीण. त्यात इतक्या सगळ्या परमिशन्स पुन्हा काढणं म्हणजे वेगळाच व्याप झाला असता म्हणून आम्ही जवळजवळ १०-१२ किलोमीटर गर्दीत तो कॅमेरा घेऊन मी फिरायचो. तो ही एक वेगळा आणि कायम समरणात राहील असा अनुभव होता. माझ्यासाठी ‘खिचिक’ म्हणजे एक नवं विद्यापीठ होतं जे मला सतत काही ना काही शिकवत होतं.