सध्या गावोगावी जत्रा भरणे सुरू असून वर्षातून एकदा येणाऱ्या या जत्रा अतिशय जल्लोषात भरवल्या जातात.लोकनाट्य तमाशे होतात,विविध लेझीम पथके येतात त्यांचे खेळ होतात.या जत्रेतील आकर्षणाची बाब असते ती म्हणजे कुस्त्यांचा फड.अजूनही आपले आकर्षण टिकवून ठेवणाऱ्या या क्रीडा प्रकाराने अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले.
कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे.डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते.या खेळात अनेक डाव असतात.कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी.भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते.असा हा तांबड्या मातीत खेळला जाणाऱ्या खेळात पैलवाणाचा अक्षरशः घाम निघतो.आई वडील पै न पै एकत्र करून असा पैलवान तयार करतात अगदी हजारोच नाही तर लाखो रुपये या पैलवानांच्या खुराकासाठी वर्षाकाठी खर्च होतो.
एकीकडे कसरत करून शरीर तर पिळदार बनविण्याचा अट्टाहास असतो परंतु दुसरीकडे खुराकाला पैसे कमी पडत असतात म्हणून मन पिळले जात असते.तेव्हा या खुराकाचा खर्च भागविण्यासाठी पैलवान गावोगावी भरविल्या जाणाऱ्या जत्रेतील आखाड्यात आपल्या कुस्त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी उतरत असतात.तेव्हा गावातील नावाजलेले पुढारी ह्यांच्यावर इनाम लावतात व चितपट करणाऱ्या पैलवानाला तो इनाम दिला जातो.इथपर्यंत गोष्ट वाचण्यासाठी सहज साधी सोपी वाटते परंतु प्रत्यक्षात असलेली परिस्थिती अतिशय विदारक आहे.
पैलवान आपल्या खुराकीचा कोठा पूर्ण करण्यासाठी या जत्रेतील कुस्त्यांमध्ये भाग घेतात परंतु तालमीत भल्याभल्या पैलवानांना आस्मान दाखवणाऱ्या पैलवानांना मात्र ग्रामस्थांनी दिलेल्या वागणुकीमुळे अस्मान पाहावे लागते ही शोकांतिका आहे.अनेक गावातील जत्रेत योग्य नियोजन नसल्याकारणाने पैलवानांना गाव पुढाऱ्यांच्या मागे आमची कुस्ती लावा म्हणून फिरावे लागते,तर काही पैलवानांना जिंकून देखील पूर्ण इनाम भेटत नाही.
कधी कधी इनाम दोघात वाटून दिला जातो तर कधी कधी केवड्या, रेवड्या पैलवानांच्या हातात टेकवल्या जातात यामध्ये पैलवानांचा जाण्यायेण्याचा खर्च देखील निघत नाही.मग त्यानंतर इनाम वाढवून द्यावा म्हणून गाव पुढाऱ्यांच्या पुढे हात पसरावा लागतो मग जत्रेच्या वेळी पांढऱ्या पोशाखात सजलेले हे पुढारी मात्र प्रसंगी आशा पैलवानांना हात जोडून बाहेर काढताना दिसतात तांबड्या मातीत भल्याभल्या पैलवानांना अस्मान दाखवणारे पैलवान गावगाड्यात मात्र हरून खचून जातात.
हे चित्र कुठेतरी बदलायला हवे व त्यांचा उचित सन्मान गावोगावी व्हावा.अंगी मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या अशा पैलवानांना मानाची वागणूक गावोगावी द्यायला हवी तसेच शासनाने देखील अशा पैलवानांसाठी त्यांच्या खुराकासाठी काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून अशी अपमानास्पद वागणूक त्यांच्या नशिबी येणार नाही त्यामुळे चांगले खेळाडू घडण्यास मदत होईल व असे खेळाडू फक्त देशातच नव्हे तर जगभरात देशाचे नाव करतील.
सौजन्य : पत्रकार प्रा.सचिन माथेफोड