हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह ह्या प्रमाणेच कॅन्सर अनेक लोकांमध्ये आढळून येत आहे. हृदयविकारा नंतर कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यू होतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार देशातील 11.5 लाख लोकांना दरवर्षी कर्करोगाचे निदान होते. 2020 मध्ये भारतातील प्रत्येक एक लाख पुरुषांपैकी 94 आणि प्रत्येक एक लाख महिलांपैकी 104 महिलांना कर्करोग झाला आहे.

कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी लठ्ठपणा, फळ आणि भाज्या कमी प्रमाणात खाणे, शरीराला सक्रिय न ठेवणे, तंबाखू आणि दारू ह्या कारणांमुळे जवळजवळ एक तृतीयांश मृत्यू होतात. कर्करोगाच्या सर्व मृत्यूंपैकी 22% मृत्यू हे केवळ एकट्या तंबाखूमुळे होतात. पुरुषांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग जास्त प्रमाणात दिसून येतो.

ऑन्कोलॉजिस्ट अर्थात कॅन्सरतज्ञांच्या मते ही आहेत कर्करोग दर्शविणारी लक्षणे.

शरीरावर डाग पडणे
शरीरावर मोठे आणि भिन्न रंगाचे डाग दिसल्यास सावध रहा. तोंडावर किंवा गुप्तांगांवर दीर्घकाळापर्यंत जखमा देखील कर्करोगाची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त वारंवार लघवी होणे किंवा लघवी करण्यात अडचण येणे ह्यामागे प्रोस्टेटचा वाढलेला आकार हे कारण असू शकते.

अचानक वजन कमी होणे
आहार, नित्यक्रम किंवा व्यायामामध्ये कोणताही बदल न करता आपण काही दिवसांत 4 किलोपेक्षा जास्त गमावल्यास सावधगिरी बाळगा. स्वादुपिंड, पोट, फुफ्फुसांच्या कर्करोगात वजन वेगाने कमी होते.

खूप जास्त थकवा जाणवणे
आपण तणावात असल्यास आणि नेहमीपेक्षा अधिक थकल्यासारखे वाटत असल्यास डॉक्टरांशी बोला. थकवा ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकतो. प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतही खूप थकवा जाणवतो.

सतत खोकला असणे
सतत खोकला किंवा छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर खोकला, लघवी, मल, तोंड किंवा नाक ह्या मधून नेहमी रक्त पडत असेल तर ते गर्भाशयाच्या ग्रीवेचा म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला टीबीचे ही लक्षणं असू शकते.

अंग दुखणे
संपूर्ण शरीरात कोणतेही स्पष्ट कारण दिसत नसतानाही कित्येक दिवस वेदना असणे आणि अंग दुखणे हाड किंवा स्वादुपिंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात

अशी लक्षणे दिसल्यास योग्य वेळी डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन करून घ्या.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सुरुवातीला अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की

कंबरेवर लक्ष ठेवा: पुरुषांची कंबर 37 इंचापेक्षा जास्त आणि महिलांची कमर 31.5 इंचापेक्षा जास्त नसावी.

नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे. असे जमत नसल्यास, दिवसातून दोन ते तीन वेळा 10 ते 15 मिनिटांचा व्यायाम करा.

नियंत्रित प्रमाणात मिठाचे सेवन करा: जास्त मीठ आणि सोडियमवर प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. दररोजच्या अन्नात मीठाचे प्रमाण 2400 मिलीग्राम पेक्षा जास्त नसावे.