” तान्हाजी- द अनसंग वॉरियर ” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला सर्व स्तरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विकेंडला या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. आपण आज या चित्रपटाबद्दल माहिती जाणून घेऊयात की काय आहे या चित्रपटाची खासियत ज्यामुळे हा चित्रपट एवढा चालत आहे.

आपल्याला माहिती आहे ” तान्हाजी- द अनसंग वॉरियर” हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील पराक्रमावरती बनवण्यात आलेला आहे. चित्रपट अत्यंत दिमाखदार पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. या चित्रपटाची कथा आपल्या सर्वांना माहिती असून देखील आपण सर्वांनी मिळून या चित्रपटाला एवढा प्रतिसाद दिला.

याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या टीमने कथेपासून सिनेमाटोग्राफी पर्यंत सर्व आघाड्यांवरती दमदार कामगिरी बजावलेली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत आपल्याला पडद्यावरती दिसून येते.

हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती, याचं कारण म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर. या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत खुबीने तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होईल.

आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा नक्कीच वाचली असेल, स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेला वीरयोद्धा म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख अजरामर आहे. त्यांच्या जीवनावरती आणि पराक्रमावर ती चित्रपट तयार होत आहे हीच प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी होते.

कोंढाणा किल्ल्यावरती लढाई कशी झाली आणि या किल्ल्याला सिंहगड असे नाव का देण्यात आले याचे उत्तर या चित्रपटामधून आपल्याला मिळतं. आपल्याला माहिती आहे की ऐतिहासिक चित्रपटांमध्ये बरीचशी माहिती चित्रपटाच्या कथेसाठी वेगळ्या पद्धतीने वापरली जाते.

असाच प्रकार या चित्रपटामध्ये देखील घडलेला आहे आज-काल चित्रपटांमध्ये ऐतिहासिक पात्रांना नृत्य करताना दाखवण्याची पद्धत रूढ होत आहे. या पद्धतीला हा चित्रपट देखील अपवाद नाही या चित्रपटामध्ये एका गाण्यादरम्यान तानाजी मालुसरे यांना नृत्य करताना दाखवण्यात आलेले आहे.

याबरोबरच या चित्रपटामध्ये काही असे सीन आहेत जे आपल्याला ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आढळत नाहीत. त्याचा उल्लेख येथे करणे योग्य होणार नाही त्यासाठी चित्रपट आपण सिनेमागृहात जाऊन बघणे अधिक योग्य ठरेल.

मित्रांनो तांत्रिकदृष्ट्या तान्हाजी चित्रपट बॉलिवूडचा इतर ऐतिहासिक चित्रपटांपेक्षा नक्कीच उजवा आहे. या चित्रपटांमध्ये VFX चा वापर अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे ही या चित्रपटाचे अत्यंत जमेची बाजू आहे आणि याद्वारेच त्यावेळचा ऐतिहासिक काळ उभा करण्यामध्ये चित्रपट निर्मात्यांना यश आलेल आहे.

त्यांचे याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. चित्रपटातील वातावरण कुठेही कृत्रिम वाटत नाही या चित्रपटाचा सेट, रंगभूषा, वेशभूषा अत्यंत चांगल्या पद्धतीने जमलं आहे. शरद केळकर या मराठमोळ्या अभिनेत्याने या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्याने ही भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे.

त्यासोबतच त्याची वेशभूषा देखील शिवाजी महाराज यांना साजेशी अशीच आहे. अशाच प्रकारे या चित्रपटामध्ये इतर पात्र देखील अगदी उत्तम प्रकारे साकारण्यात आलेले आहेत. अजय देवगन यांचा अभिनय आपल्याला तानाजी मालुसरे यांची आठवण करून देतो.

काजोलनेही लक्ष्मीबाई यांची भूमिका अत्यंत उत्तम प्रकारे साकारली आहे. याचबरोबर अभिनेता सैफ अली खान याने या चित्रपटामध्ये उदयभान याची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. या चित्रपटामध्ये प्रत्येक अभिनेत्याने त्याची भूमिका अत्यंत साजेशी वठवलेली आहे.

यासोबतच या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांनीही दमदार काम केलेलं आहे. अभिनेता देवदत्त नागे याने तानाजी यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची भूमिका दमदाररित्या केलेली आहे. या चित्रपटातील संगीत आणि गाणी कुठेही कथेला सोडून वाटत नाहीत आणि चित्रपटातील संगीत प्रेक्षकाला खेळून ठेवण्यात मदत करते.

या चित्रपटामध्ये अनेक इमोशनल सिन देखील आहेत या चित्रपटाची कथा आपल्याला आधीपासूनच माहिती आहे तरीही हा चित्रपट आपल्याला पुन्हापुन्हा बघावा वाटतो हेच दिग्दर्शकाचे यश आहे. थ्रीडीमध्ये हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे, या चित्रपटातील लढाईचे काही सीन थ्रीडी मुळे अधिक उठावदार वाटताहेत.

चित्रपट आपण सर्वांनी सिनेमागृहात जाऊन बघावा ही विनंती आणि आम्हाला त्या चित्रपटाबद्दल तुमचा प्रतिसाद कमेंट बॉक्समध्ये द्यावा.