स्वप्निल जोशी, हा मराठी सिनेसृष्टीतील एक चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची चॉकलेट बॉयची छबी आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, हाच हँडसम हिरो, आपल्या अभिनयाचे निरनिराळे पैलू सुद्धा त्याच्या विविध चित्रपटांमधून दाखवून देतो. त्याच्या दर्जेदार अभिनयाची झलक असलेल्या सिनेमांपैकीच एक, म्हणजे ‘मोगरा फुलला’ हा सिनेमा! येत्या रविवारी, म्हणजेच ८ डिसेंबरला हा सिनेमा ‘झी टॉकीज’वर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता या वाहिनीवर होणार आहे. स्वप्निल जोशीचा अप्रतिम अभिनय आणि उत्कृष्ट कौटुंबिक कथा अशी दुहेरी मेजवानी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा आहे. झी टॉकीज प्रेक्षकांसाठी नेहमीच खास आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा खजिना घेऊन येत असते. ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट सुद्धा याच खजिन्याचा पेटीतील आणखी एक सुंदर अलंकार आहे.

हल्लीच्या काळात लुप्त होत जाणारी एकत्र कुटुंबपद्धती, हा या चित्रपटाचा गाभा आहे. आपल्या सगळ्यांचाच हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एकत्र राहणाऱ्या या मोठ्या कुटुंबाची गोड कहाणी, प्रसंगी येणारे ताणतणाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आई व मुलामधील मतभेदावर प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे. प्रत्येक आईला, तिचं एक मूल हे सर्वाधिक प्रिय असतं. आईचं विश्व त्याच्याभोवती खिळलेलं असतं. अशावेळी, लग्नानंतर, त्या मुलाची बायको घरी आल्यावर, परिस्थिती बदलते. आपला मुलगा आता काही प्रमाणात का होईना, पण आपल्यापासून दुरावणार, ही भावना आईच्या मनात येऊ लागते. आपलं विश्व आता कुणाबरोबर तरी वाटून घ्यायचं, ही आईच्या मनाची घालमेल, त्यातून बदलत जाणारे आई व मुलातील संबंध या सगळ्यावर हा चित्रपट भाष्य करतो. त्यातच, मुलगा प्रेमविवाह करणार, म्हणजे आपल्यापासून आणखी दूर होणार ही भीती सुद्धा आईच्या मनात आहे. म्हणून, तिचा मुलाच्या प्रेमाला असलेला विरोध सुद्धा या चित्रपटात पाहायला मिळतो. आईसाठी तिचा मुलगा आणि बायकोसाठी तिचा नवरा म्हणजे हक्काचं माणूस! त्यामुळेच या दोन्ही स्त्रियांच्यात एकमेकांविषयी निर्माण होत असलेला कडवटपणा व त्यामुळे बिचाऱ्या पुरुषाची होणारी द्विधा मनःस्थिती; अशी परिस्थिती सुद्धा या चित्रपटाच्या कथानकात पाहायला मिळेल. स्वप्निल जोशीच्या उत्तम अभिनयामुळे या विषयाला योग्य न्याय मिळालेला आहे. या सगळ्या स्थितीत, मुलाला त्याचं प्रेम मिळणार का? की आणखी काही घडणार? हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.

‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल जोशीसोबत संवाद साधला असता, त्याने त्याच्या आयुष्यातील एक छानशी ‘मोगरा फुलला मुमेंट’ शेअर केली आहे. त्याने त्याच्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं, तो क्षण त्याच्यासाठी आयुष्यात सगळ्यात आनंदाचा क्षण होता, असं तो आवर्जून सांगतो. त्याला मुलगीच हवी होती, हे डॉक्टरांना ठाऊक होतं. त्यामुळे, त्याला मुलगी झाल्यावर, ती गोड बातमी देताना त्याच्याकडे पार्टीची मागणी डॉक्टरांनी केली, हेसुद्धा त्याने आठवणीने सांगितले. स्वनिलचं स्वप्न पूर्ण झाल्याचं आनंद हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळ्यांना झाला होता. ‘मोगरा फुलला’मधील आईसाठी जसा तिचा मुलगा खूप प्रिय आहे, तशीच माझी मायरा सुद्धा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, हेही सांगायला स्वप्निल विसरला नाही