दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात.

अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. यावर्षी तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात नुकताच हा सोहळा पार पडला.

यंदा प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी मराठी हिने २० वर्षे पूर्ण केली त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच रंगत होती. मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, विनोदी स्किट्स आणि अभिजित खांडकेकर याच्या जोडीला झी मराठीच्या सर्व लाडक्या कलाकारांनी केलेल्या तुफान सूत्रसंचालनाच्या फटकेबाजीने ‘झी मराठी अवॉर्डस २०१९’हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला.