बाप तसा बेटा ह्या म्हणीप्रमाणे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ह्यात अजून एका स्टारकिडचं नाव जोडल्या गेलं आहे.

अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ह्यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच ‘नवे लक्ष्य’ ह्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

ललित २०५’ ह्या मालिकेच्या निर्मितीनंतर सोहम बांदेकर आता ‘नवे लक्ष्य’ या आगामी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ह्यात तो एका जबाबदार पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

मला अभिनयाची आवड होती, पण एका मालिकेची निर्मिती केल्यानंतर माझे अभिनयावरील प्रेम दुप्पट झाले आहे असे तो म्हणाला. आपल्या टीव्हीवर पदार्पणाबद्दल बोलताना सोहम म्हणाला, “इतर कलाकारांना काम करताना पाहून मी एखादा सीन कसा केला असता याचा अभ्यास करायचो. माझ्या अभिनयाच्या पदार्पणाची ही सुवर्णसंधी आता ‘नवे लक्ष्य’ मुळे आली आहे. ह्यात मी पीएसआय जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारत आहे.”

मालिकेबद्दल बोलताना सोहम म्हणाला, “पोलिस खात्याचे योगदान शब्दात सांगता येणार नाही. या खऱ्या नायकांचे चित्रण करणे खूप आव्हानात्मक आहे. हा युनिफॉर्म घातल्यानंतर तुम्हाला खूप वेगळ्या वाईब्स मिळतात. या गणवेशात इतकी ताकद आहे की मला अजिबात थकल्यासारखे वाटत नाही.”

“मी पीएसआय जयची भूमिका साकारत आहे. पीएसआय जय लहानपणापासूनच पोलिस आणि युनिफॉर्मविषयी उत्साही असतो. महिलांविषयी खूप आदर असलेल्या जय आपल्या वडिलांचे आव्हान स्वीकारतो आणि एमपीएससीमध्ये प्रथम क्रमांक मिळवितो. जय त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि म्हणूनच तो त्याच्या आईचे नाव लावतो. खऱ्या आयुष्यात देखील माझी आई माझ्या खूप जवळ आहे. माझ्या दोन्ही पालकांच्या पाठबळामुळे मी हे आव्हान स्वीकारण्यास सक्षम होतो. गेल्या एका वर्षात मी माझ्या फिटनेससाठी बरेच प्रयत्न केले आहेत. माझ्यासोबतच उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र आणि बरेच कलाकार ह्यात आहेत. प्रेक्षकांना नक्कीच नवे लक्ष्य आवडेल.”

नवे लक्ष्य ही मालिका महाराष्ट्र पोलिसांच्या कामांवर आधारित असून त्यात महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसी व खऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. महाराष्ट्र सुरक्षेसाठी २४ तास कर्तव्य बजावण्याऱ्या महाराष्ट्र पोलिस खात्याचा संघर्ष या मालिकेतून दाखविला जाईल. सोहम बांदेकर किंवा नवे लक्ष्यचे निर्माते आदर्श बांदेकर यांच्याकडून याविषयी अजून कोणतीही माहिती फारशी समोर आलेली नाही.