श्वेता शिंदे हे नाव मराठी मनोरंजन विश्वासाठी नवीन नाही. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधील मालिकांमधून तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवलेली आहे. १५ वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग सुद्धा निर्माण केला. तिच्या काळातील प्रमुख अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जून घेण्यात येते. या गुणी अभिनेत्रीने नंतरच्या काळात निर्मिती क्षेत्रात सुद्धा काम केले. एका अप्रतिम मालिकेची निर्मिती करून, तिथेही आपला ठसा उमटवण्यात ती यशस्वी ठरली. श्वेताच्या चाहत्यांसाठी, ‘झी युवा’ वाहिनी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. मोठ्या ब्रेकनंतर, ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. १२ फेब्रुवारीपासून, ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू होत असलेल्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत, श्वेताला डीनच्या भूमिकेत पाहता येईल. तिच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर ठरली आहे. त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला, मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळणार आहे.


एवढ्या वर्षानंतर पुनरागमन करत असलेली श्वेता, आजही तिच्या लुकच्या जोरावर सर्वांना घायाळ करते आहे. लाल साडीतील तिचा झकास लुक पाहून, मालिकेतील तिची भूमिका पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. डॉक्टर डॉन या मालिकेत, मेडिकल कॉलेजच्या एका कठोर आणि शिस्तप्रिय डीनची भूमिका श्वेता साकारते आहे. देवदत्त नागे साकारत असलेला डॉन तिच्या पुरता प्रेमात वेडा झालेला आहे. मालिकेमधील तिचा पहिलाच लुक बघून, ती संपूर्ण मालिकेत ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ दिसणार असल्याचे लक्षात आले आहे.


या भूमिकेविषयी बोलताना, ती म्हणाली;”प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्य वाटेल अशी एखादी गोष्ट करणं नेहमीच खास असतं. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत मी साकारत असलेली डीनची भूमिका, ही मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. डीन कामाच्या बाबतीत चोख आणि शिस्तप्रिय आहे. देवासारख्या डॉनच्या संपर्कात आल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलून जाते, हे या मालिकेत पाहायला मिळेल. ‘झी युवा’च्या या दर्जेदार मालिकेत, देवदत्त नागेसोबत काम करण्याची संधी मिळणे, हा दुग्धशर्करा योग आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी मी साकारत असलेली ही वेगळी भूमिका सगळ्यांना नक्की आवडेल, याची मला खात्री वाटते आहे.”