महाराष्ट्रात सत्तास्थापनेबद्दलच्या वेगवान घडामोडी घडतायत. सरकारस्थापनेसाठीची मुदत आज संपल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आणि पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्ला चढवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सेनाभवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर प्रतिहल्ला केला. राज्यातली सत्तासमीकरणं बदलणार याचीच चिन्हं या दोन पत्रकार परिषदेनंतर दिसू लागली. त्यातच आता शिवसेनेने मातोश्रीबाहेर बॅनर लावले आहेत.

‘काही दिवसांत शीवतीर्थावर हा आवाज घुमेल, मी हिंदूहृ्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….’असा मजकूर या बॅनरवर आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंचा हा शपथविधी या बॅनरमधून सूचित करण्यात आला आहे, अशी चर्चा रंगली आहे.

सेना – काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्र येणार?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत वेळोवेळी शरद पवारांशी चर्चा करत आहेत. यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्तेसाठी समीकरणं जुळणार का या चर्चाही जोरात सुरू आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला. या राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं वचन मी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं, असं ते म्हणाले. आता त्यांनी दिलेल्या वचनानुसार, खरंच शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.