Shentimental Review

1031

Shentimental Marathi Movie Review

Shentimental  शेंटिमेन्टल’ सिनेमा अखेर रिलीज झाला. हा सिनेमा अशोक सराफ यांचा कमबॅक सिनेमा असल्याची जोरदार चर्चा रंगली आणि सिनेमाची उस्तुकता वाढली. तर सिनेमा अशोक सराफ यांचा कमबॅक आहे का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, हो. त्यांची विनोदी शैली त्यांचा मिश्किल अंदाज सिनेमात उत्तम रंगलाय. सिनेमा पोलिसांच्या व्यथेला आणि कथेला अधोरेखीत करतो. या आधीही याच विषयावर अनेक सिनेमे आले आणि गेले सुद्धा. पण हा सिनेमा थोडा वेगळा ठरतो ते त्यातल्या विविध पैलूंमुळे.
काय आहे स्टोरी ?
कॉन्स्टेबल प्रल्हाद घोडके म्हणजे अशोक सराफ, इन्स्पेक्टर दिलीप ठाकूर म्हणजे उपेन्द्र लिमये आणि इन्स्पेक्टर सुभाष म्हणजे विकास पाटील यांच्यावर सिनेमा रेखाटलाय. त्यांची वैयक्तिक आयुष्य आणि पोलिसांची नोकरी यात पिसत असलेले हे तिघं एका केसवर काम करत असतात आणि त्या केसचा छडा लावण्यास या तिघांना थेट बिहारला जावं लागतं. इथेच एक धमाल प्रवास सुरू होतो या तिघांचा आणि ओघाने सिनेमासुद्धा. प्रवासतली धमाल, सिनेमातली विनोद निर्मिती आणि एकंदरित प्रत्येक पात्राची कमाल रंगत जाते आणि सिनेमा जोर धरतो. पण सिनेमाचा मुळ आशय आणि विषय थोडा बाजूला टाकला जातो. सिनेमाची कथा फार काही ग्रेट आहे असं नाही पण उत्तम अभिनय आणि चोख दिग्दर्शनामुळे सिनेमाला तारलं. सिनेमाचा ग्राफ शेवटाकडे जरा खेचला जातो. अशोक सराफ यांचा शेवटची सोलोलुकी पुन्हा एकदा सिनेमाच्या विषयाची आठवण करुन देते पण तोवर सिनेमा संपला असतो. त्यामुळे ही सोलोलुकी सुद्धा उगाच आहे असंही वाटू शकतं. पण हा पोलिसातला माणुसकी न हरवलेला प्रल्हाद घोडके मात्र मनात घर करुन जातो.

नवीन काय ?
सिनेमातलं कास्टिंग नवीन नाहीये पण त्यांचा अंदाज त्यांचा लहेजा आणि कॅरेक्टर्स वेगळी आहेत. सिनेमाचं शैली थोडी वेगळी आहे आणि ती अनेक वेळा डोकावते विविध सीन्समधून.
सिनेमा का पहावा ?
प्रामुख्याने अशोक सराफ यांच्यासाठी त पहावाच पहावा. त्यांची विनोदी स्टाईल त्यांचा मिश्किल अंदाज आणि त्यांची शैली त्यांनी आजही जपलीये आणि ती कुठेही अती होत नाही की त्याचा कंटाळा येत नाही. समीर पाटील यांच्या दिग्दर्शनासाठी तर निश्चित पहावा. कथेत फार वेगळेपण नसताना सुद्धा ती वेगळ्या पद्धतीने कशी हाताळावी आणि प्रेक्षकांपर्यंत ती कशी पोहचवावी हे गणित या सिनेमात समीर यांना उत्तम जमलंय. शिवाय सिनेमाचं परफेक्ट कास्टिंग आहेच. एक एक कॅरेक्टर आणि प्रत्येक भूमिका लक्षात रहाते कारण चोख कास्टिंग झालय. विनोद निर्मिती छान जमलीये. सिच्वेश्नल कॉमेडी जी आजकाल कमी पहायला मिळते ती या सिनेमात मस्तच रंगलीये. या सगळ्या जमेच्या बाजू पाहताना सिनेमात काही त्रुटी राहतात आणि म्हणून आपण खळखळून हसतो तर पण शेवटी मात्र सिनेमाचा हेतू तेवढा साध्य होत नाही.