
भारतीय महिलांमध्ये दिवसेंदिवस ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच योग्य तपासणी आणि निदान न केल्याने ह्याचा धोका वाढतो. अनुवांशिकतेमुळे होणारा कर्करोग रोखता येत नसला तरी इतर कारणामुळे होणाऱ्या ह्या कर्करोगाचा धोका योग्य तपासणी आणि उपचाराद्वारे कमी करता येऊ शकतो.
मोठमोठ्या आणि महागड्या तपासण्या सर्वांनाच परवडतील असे नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी काही सोप्या पद्धतीने स्वतःच्या स्तनांची तपासणी म्हणजेच सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन करू शकता. काय सांगता विश्वास बसत नाही. पण हे खरे आहे घरच्या घरी अगदी काही मिनिटांत तुम्ही ही तपासणी करु शकता. चला तर जाणून घेऊया त्याबद्द्ल.
स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हणजे काय?
स्तनाचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनात गाठ येणे. हा कॅन्सर अनुवांशिक असू शकतो किंवा इतर कारणांमुळे ही होऊ शकतो. अनुवांशिक स्तनाचा कर्करोग म्हणजे आई, मावशी किंवा आजीला जर अशा प्रकारचा कर्करोग झाला असेल तर हा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
सुरुवातीला ह्या रोगाची गाठ खूप छोट्या आकाराची असते व दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे योग्य वेळी निदान होत नाही. जेव्हा ही गाठ मोठी होते तेव्हा ती स्तनात किंवा काखेत स्पष्टपणे जाणवते. ह्यासोबतच खालील लक्षणे ही दिसून येतात:
- स्तनांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे
- स्तनावरील त्वचेत बदल होणे
- स्तन किंवा काखेत कायम दुखणे
- स्तनाग्र (निपल)ची जागा किंवा आकार बदलणे
- निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येणे
- निपलच्या आजूबाजूला पुरळ येणे किंवा लाल होणे
गेल्या काही वर्षात 20-40 वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बरेच वाढले आहे. कर्करोग असणार्या महिलांपैकी 25-30% महिला ह्या ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त आहेत. महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे महिलांप्रमाणेच पुरुषांनी ही सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन करणे गरजेचे आहे. ह्यामुळे कॅन्सरच्या लवकर निदानास मदत होते.
कशी कराल तपासणी?
झोपून किंवा आरश्यासमोर उभं राहून तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन करु शकता. ही तपासणी करताना खालील गोष्टींकडे आवर्जून लक्ष देऊन तपासणी करा:
- स्तनांचा बदललेला आकार किंवा रंग.
- स्तनांना सूज येणं.
- स्तन लाल होणे किंवा त्यावर व्रण येणे.
- स्तनाग्रांची (निपल) जागा बदलणे.
- निपल जर आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
- निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येणे.
- हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवा.
- तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब देऊन कुठली गाठ आहे का तपासा.
ह्या तपासणीसाठी केवळ तीन ते पाच मिनिटे लागतात.
मासिक पाळी झाल्यावर चार-पाच दिवसांनी किंवा स्तन मऊ असतील तेव्हा ही तपासणी करावी. मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांनी तर महिन्यातून एकदा ही तपासणी करावी.