टेलिव्हिजन आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिच्या बस्ता या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्च ला झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने सायलीसोबत साधलेला खास संवाद

१. लग्न संस्थेवर आधारित चित्रपट स्वीकारताना तुमची भावना होती?
– मला या चित्रपटाचा विषय खूप आवडला आणि त्यातील माझ्या वाट्याला आलेली भूमिका मला खूपच भावली. लग्नसंस्थेवर आपण अनेकदा भाष्य करतो, पण एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न यावर प्रकाश टाकणारी हि कथा आहे. त्यामुळे हा उत्तम विषय मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाला मी काहीच विचार न करता लगेच स्वीकारलं.

२. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा.
– मी या चित्रपटात स्वाती या एका शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिने लहानपणापासून तिच्या वडिलांचा त्रास, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत बघितली आहे. त्यामुळे तिला शेतकऱ्याशी लग्न करायचं नाही आहे. तिला एका नोकरदार मुलाशी लग्न करायचंय. गावाकडची बऱ्यापैकी शिकलेली हि स्वाती भावनिक न होता खूप प्रॅक्टिकल विचार करणारी आहे.

३. या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून तुम्हाला मिळालेली प्रतिक्रिया?
– मला खूप चांगल्या प्रतिक्रिया या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून मिळाल्या. मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश या चित्रपटाने दिला आहे असा मला बऱ्याच लोकांकडून प्रतिसाद मिळाला. खूप कौतुक देखील झालं.

४. तुमचा लग्न संस्थेवर किती विश्वास आहे? मोठ्या स्तरावर लग्न करण्याची हल्ली पद्धत सुरु झाली आहे त्यावर तुमचं काय मत आहे?
– माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे. मला असं वाटतं कि लग्न सोहळा कसा असावा हा त्या प्रत्येक मुला-मुलीचा वैयक्तिक निर्णय आहे. काहींना खूप मोठ्या स्तरावर लग्न सोहळा केलेला आवडतो तर काहींना थोडक्यात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करायला आवडतं. हि प्रत्येकाची आपली आपली निवड आहे.

५. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीज सादर करणार आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
– कोरोनाच्या काळानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला बस्ता हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आता झी टॉकीजवर २१ मार्चला होणार आहे. त्यामुळे मी रसिक प्रेक्षकांना हेच सांगेन कि या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. आमच्यावर जस आजपर्यंत प्रेम करत आला आहात तसंच करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

६. हा चित्रपट शूट करत असतानाचा एखादा ऑफ-स्क्रीन किस्सा जो तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू इच्छिता?
– माझे सेटवर खूप लाड व्हायचे. मी एका वेगळ्या चित्रपटासाठी थोडं वजन वाढवलं होतं आणि बस्तासाठी मी एक गाणं शूट करत होती, ज्यात अक्षयला मला उचलून घ्यायचं होतं. त्यात असा सिन होता कि मी धावत येते आणि मग अक्षय मला उचलून घेतो आणि हा एक रोमँटिक सिन असल्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप रोमँटिक एक्सप्रेशन्स होते पण हळूच मी अक्षयला बोलत होती कि मला खाली नको पाडू. त्यामुळे जेव्हापण आम्ही ते गाणं बघतो तेव्हा आम्हाला हसू येतं.