सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा सहा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांची मनं जिंकल्यावर आता ती बंगालीमध्ये आपलं पहिलं ‘सिंगल’ घेऊन आली आहे. ‘शोन रे शोखी’ हे तिचं पहिलं बंगाली गाणं रिलीज झालंय.

बंगाली गाणं गाण्यासाठी सावनी बंगाली शिकली. ती म्हणते, “गाणं गाताना शब्द उच्चारणही महत्वाचं असतं. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो ही यायला हवा. त्यामूळे गाण्यावर अर्थातच खूप मेहनत करावी लागली. हे गाणं आपली स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या मुलीचं मनोविश्व सांगणारं गाणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना मनोबल देणारं आणि सकारात्मक दृष्टीकोन देणारं गाणं आहे.”

सावनीने गायलेल्या ह्या गाण्याचे गीत लिहिले आहेत, नाबरून भट्टाचार्य जी ह्या गीतकारने. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. गाण्याचे चित्रीकरण गोव्यात झालेलं आहे. गाण्याच्या मूडनूसार, गोव्यासारख्या शांत आणि रम्य ठिकाणाची निवड करण्यात आलीय. नवीन शहरात एकटीने राहणं, वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणं, आणि करीयर करणं हे कठीण जरूर असतं, पण अशक्य नसतं हेच ह्या व्हिडीयोतून दर्शवण्यात आलंय. डॉ. आशिष धांडे ह्यांनी ह्या गाण्याची निर्मिती केलीय. नवीन वर्षात सावनीचा नव्या सिनेसृष्टीतलं हे पहिलं पाऊल निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.