राम राम मंडळी, सध्या प्रेक्षकांना ऐतिहासिक सिनेमांचा जमाना आहे असं म्हणायला हरकत नाही. मुळशी पॅटर्नच्या खतरनाक यशानंतर खतरनाक अभिनेते,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या नव्या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असताना आपल्याला दिसतंय. मुळशी पॅटर्ननंतर प्रवीण तरडे कोणता सिनेमा घेऊन येतायत याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मराठी सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची गोष्ट.

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘सरसेनापती हंबीरराव’ या त्यांच्या नव्या सिनेमाचं पोस्टर तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे. या सिनेमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची थरारक शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मंडळी,चला तर मग तरडेंच्या या नव्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आहे तरी काय जाणून घेऊया. पोस्टरच्या वरील बाजूस ‘सरसेनापती हंबीरराव’ असं सिनेमाचं भलंमोठं झकास टायटल आहे. विजेच्या कडकड्यासह मुसळधार भर पावसात सूर्य दाखवला आहे. मुसळधार पावसाच्या सरींबरोबर दोन्ही हात जोडले सरसेनापती हंबीरराव पाठमोरे उभे आहेत. भारदस्त शरीर, मानेपर्यंत केस वाढलेले, मजबूत शरीरयष्टी, धोतर घातलेले आपल्याला दिसते आहे. सरसेनापती हंबीरराव यांचा चेहरा कसा दाखवला आहे याची उत्सुकता ताणून धरण्यासाठी पाठमोरी आकृती पुरेशी आहे.

संपूर्ण पोस्टर बघता नजर खिळून राहते ती पोस्टर वरील ‘ जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखून खडा’ या शब्दांनी सरसेनापती हंबीरराव यांचं केलेल्या वर्णनाकडे. सरसेनापती हंबीरराव यांचा थरारक पराक्रम पडद्यावर बघायला मिळणार ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इतिहासाच्या पानावर स्वराज्यातील अनेक निष्ठावंत मावळ्यांचा पराक्रम सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. आज त्यापैकी एका निष्ठवंत मावळ्याचा पराक्रम प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती.

तरडे यांच्या आजवरच्या सगळ्या सिनेमांनी रसिकमनावर नाव कोरले. याचप्रकारे हा सिनेमाही तरडे यांना अभूतपूर्व यश मिळवून देण्याची शक्यता मानायला हरकत नाही.  तरडे यांच्या खतरनाक लेखणीतूनच हा सिनेमा तयार झाला असून सिनेमाचं दिग्दर्शनही स्वतः तरडे यांनीच केले आहे. उर्विता प्रोडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी केली आहे.

हे आकर्षक पोस्टर आणि ज्या शब्दांमध्ये सरसेनापती हंबीरराव यांचं वर्णन केले आहे यातून हा सिनेमा भव्यदिव्य असणार यात शंका नाह. तरडे यांचा मराठी सिनेसृष्टीला एक वेगळा खतरनाक पटर्न दाखवला त्याच ताकदीचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक पॅटर्न देखील महाराष्ट्राच्या मनात घर करेल.

या सिनेमाचे शुटींग सुरू होऊन बरेच दिवस झाले, या पोस्टरने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे म्हणायला हरकत नाही. हा ऐतिहासिक पॅटर्न बघण्यासाठी मात्र जून महिन्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पहिलं पोस्टर रिलीज झालं होतं त्यावेळी सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली होती पण तेही हे नवं पोस्टर बघून आपल्या लक्षात आलंच असेल.

सिनेमात कोणती आणि किती गाणी असतील, सिनेमाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत, या पॅटर्नमध्ये आणखी कोणते कलाकार आपल्याला बघायला मिळतील हे कळवून घेण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट बघावी लागणार. तर मंडळी, तरडे यांचा थरारक पॅटर्न ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचे पोस्टर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.