मराठी सिनेसृष्टीतली सई ताम्हणकर ही एकमेव अभिनेत्री आहे जिचा फॅनक्लब गेली काही वर्ष सामाजिक जीवनात कार्यरत आहे. सईहोलिक्स फॅनक्लब सई ताम्हणकरवर मनापासून प्रेम करतो. सईहोलिक्स सईचे फक्त सिनेमेच पाहत नाही तर तिच्या विचारसरणीचेही अनुकरण करणारा हा फॅनक्लब आपल्या आवडत्या अभिनेत्रीची वर्षातून एकदातरी भेट घेतोच. आणि ह्या स्नेहसंमेलनाला सईचे देशाच्या कानाकोप-यातले फॅन्स तिला भेटायला येतात.

कतारमध्ये झालेल्या धुरळाच्या प्रीमियरनंतर सईहॉलिक्सने नुकतीच सई ताम्हणकरची भेट घेतली. ह्या छोटेखानी गेट-टूगेदरला मुंबई, वर्धा, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले तसेच गुजरात आणि इतर राज्यांमधले फॅन्सही पुण्यात आले होते. सईहोलिक्स फॅनक्लबला आता पाच वर्ष झाली आहेत, त्याचेही सेलिब्रेशन करण्यात आले.

सूत्रांच्या अनुसार, ग्लोबल स्टार सई ताम्हणकरला महागड्या भेटवस्तूंपेक्षा जिव्हाळ्याने दिलेली छोटीशी गोष्टही आवडते. हे तिच्या चाहत्यांना माहित आहे. त्यामूळे सईहोलिक्स फॅनक्लबच्या अनेकांनी हँडमेड गिफ्ट्स सईसाठी आणली होती. निसर्गप्रेमी सईनेही आपल्या चाहत्यांना रोपटी भेट दिली.

ह्या सेलिब्रेशनवेळी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, ”सईहोलिक्स हे माझं कुटूंब आहे. त्यांना दरवेळी भेटताना मला खूप आनंद होतो. मला भेटायला माझे चाहते दूर-दूरवरून येतात, ह्याचं मला खूप अप्रूप आहे. सईहोलिक्सना दरवेळी भेटल्यावर एक नवी एनर्जी घेऊन मी जात असते. अधिकाधिक चांगलं काम करण्याची उर्जा मला त्यांच्याकडून मिळते.”