‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. या संकल्पना प्रेक्षकांना पसंत पडतात आणि मालिका लोकप्रिय होतात. अशीच आणखी एक प्रेमकहाणी ‘झी युवा’ घेऊन येत आहे. ‘साजणा’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मालिकेचा टीजर आणि शीर्षकगीत यांनी प्रेक्षकांच्या मनावर आतापासूनच भुरळ घालायला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेले हे गीत, किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी लिहिलेले आहे. अभिजित-विश्वजित या प्रसिद्ध जोडीने हे अप्रतिम गीत, संगीतबद्ध केले आहे. सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आलेल्या असल्याने, हे गीत प्रेक्षकांना खूपच पसंत पडते आहे. शीर्षकगीत आवडू लागल्याने, प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
१५ एप्रिलपासून ‘साजणा’ ही नवी मालिका, झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र व मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी अशी नवीकोरी जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका गावात या मालिकेचे कथानक घडताना पाहायला मिळेल. पहिलाच टीजर प्रेक्षकांना पसंत पडल्याने, या नव्या कथानकाविषयी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. एका श्रीमंत घरातील मुलगा आणि एका गरीब घरातील मुलगी यांची ही प्रेमकथा आहे. शीर्षकगीताप्रमाणेच मालिकादेखील लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल अशी खात्री आहे.
या शीर्षक गीताविषयी बोलताना, गायक स्वप्नील बांदोडकर म्हणतात; “एक अत्यंत सहजसुंदर असं हे गीत, लगेचच मनाला भावतं. हे नितांतसुंदर गीत प्रेक्षकांना सतत ऐकत राहावंसं वाटेल याची मला खात्री वाटते. शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं ‘झी युवा’कडून मला सांगण्यात आलं. म्हणूनच, प्रेक्षकांच्या अभिप्रायाचीदेखील मला खूप उत्सुकता आहे. गीत आपलंसं वाटत असल्याने, मालिका प्रदर्शित होण्याची उत्सुकता माझ्याही मनात आहे.”
‘साजणा’ ही नवी मालिका, ‘झी युवा’ वाहिनीवर सोमवार १५ एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे.