नेमकी भानगड काय असेल? राजस्थान मधील या किल्ल्याबद्दल तुम्ही जराशा बाबी जाणून असाल. पण मुळात इथल्या एका भुताटकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही ज्ञात आहे का? होय, भुताटकी म्हणजेच इथे काहीतरी रहस्यमय हालचाली घडल्या जातात. मुळात या गडावर सरकारकडूनच सख्त ताकीद अशी दिलीये की, सूर्य मावळतीला येताना किंवा सुर्योदयापूर्वी गडावर प्रवेश करूच नये. हा किल्ला राजस्थानमधील अलवल या जिल्ह्यात स्थित आहे.

इ.स.1583 मधे आमेरचे राजे “भगवंत दास” यांनी हा किल्ला उभा केला. त्यानंतर मुघलांनी पुढे या किल्ल्याचा वारसा चालवला. या किल्ल्याचं नामांतर “अजबगढ” वरून “भानगढ” व आता लोकांकडून थेट “भुताचा किल्ला” असं केल्या जात आहे. या किल्ल्याच्या चारी दिशांनी तटबंदी मजबूत असल्याची पहायला मिळेल. त्याचसोबत आसपास छोट्यामोठ्या टेकड्यांनी जवळच्या परिसरात जराशी रौनक नक्कीच पसरवली आहे.

वर्षा ऋतू सुरू होताच, इथे इतकी हिरवळ दाटून येते जणू आपण राजस्थानातील वाळवंटात नसून एखाद्या हिमाचल सारख्या प्रदेशात आहोत की काय? असं वाटायला लागतं. पण या किल्ल्याची एक मानलेली बाब म्हणजे, लोकांची खात्री आहे इथे “भूत” वास करत असल्याची.  मुळात भुतांच्या असण्यावर याच्याशी संबंधित स्थानिकांकडून दोन वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. त्यातील पहिली कथा तितकी प्रचलित नसली तरीदेखील काहीसा मनावर ठसा सोडून जाते.

असं मानलं जातं की , एखाद्या तपश्चर्या करणाऱ्या स्थळावर सावली किंवा अंधार पडू देऊ नये आणि नेमकं राजा “माधो सिंहाच्या” वशंजांनी किल्लाची उंची वाढवत नेली. याने परिणाम असा झाला की, तपस्वी बालूनाथ याच्या तपात सावली पडली आणि त्याने रागात येऊन तो किल्ला शापित करून टाकला.

त्यानंतर येते ती सर्वात प्रचलित कथा ती म्हणजे, राणी “राजकुमारी रत्नावती” यांची. या राणीच्या सौंदर्याची किर्ती अफाट होती आणि नेमकीच ती उपवर झाल्यावर तिचं स्वयंवर रचण्यात आलं होतं.

अशातच सिंघिया नावाच्या तांत्रिकाने तिच्यावर भाळून तिच अपहरण केलं. आणि राजकुमारीने त्याला मारलं. त्यात तांत्रिकाने मरताना सर्व उद्ध्वस्त होईन असा काहीसा शाप किल्ल्याला दिला. तसं पहायला गेलं तर दोन्ही कथानक ऐकून आजची आपली पिढी या घटना अथवा येथील भुताटक्यांवर विश्वास ठेवणार नाही. परंतु इथे एक प्रकारची नीगेटिव्ह एनर्जी वास करते ही बाब आपल्याला टाळता येणार नाही.

भारत सरकार कडून सध्या चार टीमची या ठिकाणी देखरेख वठवलेली आहे. एकदा भारत सरकारच्या काही सैनिकांनिच किल्ल्याच्या आतून तलवारी, महिलांच्या गाण्याचे व इतर आवाज ऐकू येत असल्याची ग्वाही दिली होती. या किल्याजवळ रात्री अपरात्री ऊशीरा भटकताना कोणीतरी आपल्याला जखडून घेतयं अशा प्रकारचे प्रत्यय अनेकांना येऊन गेले आहेत.

त्यामुळे हल्ली भानगडाची भानगड न उकलण्यातच प्रत्येकजण समाधान मानून केवळ किल्ला पहावा या भावनेनेच येथे येत असतो. तरी या किल्ल्याच्या अशा काही बाबी समोर आल्यावर मनात थोडीशी हूरहूर ही लागून राहतेच. हा किल्ला आतून शिल्पकलेचाही उत्कृष्ट नमूना आहे.