वास्तविक स्थळांचा संदर्भ घेऊन साकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ सचेतनपट

गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हीज्युअल तसेच मीफॅक निर्मित ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट सचेतनपटाच्या रुपात शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदूदैवतावर सचेतनपट आली आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘प्रभो शिवाजी राजा’ हा पहिला सचेतनपट ठरत आहे. अॅनिमेशनच्या या युगात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सिनेमातील काही दृश्य हे खऱ्या खुऱ्या स्थळावरून घेण्यात आली आहेत. अॅनिमेशन म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर, वास्तविकतेची झालर यातून आपणास अनुभवता येणार आहे.

शिवाजी महाराजांचे धाडसी किस्से, स्वराज्यावरील निष्ठा व स्वराज्य मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत हि आपणास सर्वांनाच माहित आहे, परंतू हा सगळा अनुभव या सचेतनपटात मांडून, त्याचे संकलन करण्याची सर्जनशीलता दिग्दर्शक निलेश मुळे यांनी लीलया पेलली. या चित्रपटात दाखवण्यात आलेले सप्तश्रुंगी मातेचे मंदिर, पुरंदर किल्ला, जगदीश्वर फोर्ट, महादरवाजा, नगारखाना, तोरणा फोर्ट, मार्कंडेय इ. दृश्यांना तत्कालीन वास्तविक छायाचित्रांचा संदर्भ जोडण्यात आला आहे. त्यासाठी ऐतिहासिक दस्तावेजातील जुने छायाचित्र गोळा करून, त्या ठिकाणांचा संपूर्ण इतिहास जाणून घेत, आणि त्यावर इतिहासकारांची मत लक्षात घेत ती अॅनिमेशनरुपात वापरण्यात आली आहेत. तसेच त्या ठिकाणांची रेखाटने ही काढण्यात आली. फोटोंच्या आधारावर त्या ठिकाणांची सचेतन प्रतिकृती निर्माण करण्याची कसब दिग्दर्शकाने यात केली असून, केवळ लहानमुलांसाठी नव्हे तर महाराजांची महती अॅनिमेशनपट तंत्रज्ञानाद्वारे थोरामोठ्यांनादेखील प्रेरणा देऊन जाईल, अशी खास आखणी यात केली आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर व ‘कणखर बांधा’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. “‘प्रभो शिवाजी राजा’ हा चित्रपट जरी अॅनिमेशनपट असला तरी महाराजांची शौर्यगाथा ही प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा प्रामाणिक हेतू आमच्या सर्व टीमचा आहे,” असे दिग्दर्शक निलेश मुळे सांगतात. शिवरायांवर अॅनिमेशन चित्रपट बनवण्याचे स्वप्न त्यांचे तीन वर्षातच पूर्ण झाले, ‘प्रभो शिवाजी राजा’ या चित्रपटामार्फत त्यांची स्वप्नपूर्ती झाली असून, शिवरायांचा धगधगता काळ आधुनिक तंत्रांच्या चष्म्यातून पाह्ण्याची संधी लोकांना लाभणार आहे.