‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटील आता वेबसीरिजच्या दूनियेत पदार्पण करतेय. पल्लवी येत्या 15 ऑगस्टला सुरू होणा-या ‘गोंद्या आला रे’ ह्या वेबसीरिजमधून दिसणार आहे.

जुलमी डब्ल्यू. सी. रॅण्ड या अधिकाऱ्याची चापेकर बंधूंनी हत्या केली होती. या घटनेवर ‘गोंद्या आला रे’ ही वेब सिरीज आधारलेली आहे. पल्लवी पाटील या मालिकेत दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या धडाडी महिलेची भूमिका साकारत आहे.अभिनेत्री पल्लवी पाटील आपल्या डिजीटल डेब्यूविषयी म्हणते, “सिनेजगतात काम केल्यावर वेबसीरिजच्या दूनियेतही काम करायची इच्छा होतीच आणि अंकुर काकतकरने मला दुर्गाबाईंची भूमिका ऑफर केली. ह्या भूमिकेचा अभ्यास करताना त्यांच्या सशक्त व्यक्तिमत्वाची जाणिव होत गेली. मला आनंद वाटतोय, की एका सशक्त भूमिकेने माझा वेबसीरिजच्या जगात डेब्यू होतोय.”

नुकताच पल्लवीने विधवा झाल्यावर केशवपन करून लाल साडीचा पदर डोक्यावर घेतलेला दुर्गाबाईंचा एक ब्लॅक एन्ड व्हाइट फोटो आणि स्वत:चा तशाच लूकमधला फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पल्लवीने आपला अंधारात उभी असलेला नऊवारी साडीतला लूक सोशल मीडियावर टाकला होता. पल्लवी ह्याविषयी म्हणते, “दुर्गाबाईंची दोन रूपं ह्या वेबमालिकेतून दिसतील. पती दामोदर चापेकर असताना त्यांना स्वातंत्र्यलढ्यात मुकपणे पाठिंबा देतानाचे, आणि दूसरे, त्यांच्या निधनानंतर परिस्थितीनूरूप निर्णय घेतानाचे रूपही तुम्हांला ह्या वेबसीरिजमध्ये दिसून येईल.”

‘गोंद्या आला रे’ मधून पल्लवी पाटील पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामूळे तिच्या चाहत्यांना ह्या वेबमालिकेविषयी उत्सुकता आहे.