मित्रांनो!, नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले त्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना त्याचा रास्त अभिमान आहेच. परंतु आपण आता हे पाहतोय की, लगेचच सर्वत्र त्याच्या नावाचा उदोउदो सुरु झाला. पण नीरजला एक सुवर्णपदक पटकावण्यासाठी किती करोडो रुपयांचा खर्च आला, हे आता समोर आले आहे. त्यानुसार एकट्या नीरजवर भारतीय सरकारने किती कोटी खर्च केले. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवरही प्रकाश पडायला हवा की नको?…

Tokyo Olympics 2020 भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशभरात नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. नीरज चोप्राचा विजय हा ऐतिहासिक होता. कारण याआधी भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये कधीच सात पदकांची कमाई केली नव्हती तसेच ऍथलेटिक्समध्येही भारताचे हे पहिलेच पदक ठरले आणि त्याने देशातील 1.38 अब्ज लोकांची मनेही जिंकली. 2016 ते 2021 या कालावधीत नीरजला किती कोटींची मदत मिळाली, पाहा…

देश जेव्हा संपूर्ण लॉकडाउनला सामोरे जात होता, त्यावेळी युरोपमधील प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी व्हिसा आणि पत्र. क्रीडा उपकरणे आणि उपकरणांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत. बायो-मेकॅनिस्ट तज्ज्ञाकडून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र निधी वाटप. तसेच टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या 26 आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आर्थिक मदत नीरजला सरकारकडून केल्या गेलेल्या मदत खर्चावर एक नजर…

परदेशी प्रशिक्षण आणि स्पर्धा – 4,85,39,639 रुपये
प्रशिक्षकांचा पगार – 1,22,24,880 रुपये
उपकरणे (चार भाले) – 4,35,000 रुपये

एकूण – 6,11,99,518 रुपये

भारत सरकारने जुलै 2019 पासून नीरजच्या ट्रेनिंग आणि परदेशी प्रशिक्षकाची व्यवस्था केली. दुखापतीतून सावरल्यानंतर नीरजने परदेशी प्रशिक्षक डॉ. क्लाऊस बार्ट्रोनिट्झ यांच्या हाताखाली भालाफेकीचे धडे गिरवले. टोकियो ऑलिम्पकपर्यंतच्या प्रवसामध्ये त्याने दक्षिण आफ्रिका, पोलंड, तुर्की, फिनलँड, झेक प्रजासत्ताक आणि स्वीडनमधील प्रशिक्षण शिबिरे आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. यासाठी त्याला सरकारकडून निधी देण्यात आला होता.

ऑलिम्पिकला जाण्याआधी शेवटच्या टप्प्यात त्याने 1097 दिवसांचे एनआयएस पटियालामध्ये प्रशिक्षण घेतले. भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असलेल्या 2014 मध्ये सुरू झालेला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत गेल्या पाच वर्षात भारताला मोठे यश मिळाले आहे. त्याचा लाभ घेणाऱ्या तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती, ऍथलेटिक्स, टेबल टेनिस, हॉकी आणि पॅरास्पोर्ट्समधील भारतातील 126 खेळाडू ऑलिम्पिक साठी पात्र ठरले.

भारतीय क्रीडापटूंनीही टीओपीएस योजनेंतर्गत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी कशी केली, याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. या योजनेच्या अंतर्गत खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, उच्च दर्जाची उपकरणे खरेदी करण्याची संधी आणि प्रतिष्ठित प्रशिक्षकांखाली प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. तसेच खेळाडूंसाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचीही नियुक्ती केली जाते. तसेच खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. या योजनेच्या परिणामाचे पडसाद टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसून आले. भालाफेकपटू नीरज चोप्रा, वेटलिफ्टर मीराबाई चानू यांसारख्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत.

या अभूतपूर्व यशामध्ये भारत सरकार आणि स्वत: त्याचे किती प्रयत्न आहेत, हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. 2016च्या जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकल्या नंतर नीरज चोप्रा प्रकाशझोतात आला. ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एखाद्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2018 कॉमनवेल्थ गेम्स आणि 2018 एशियन गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक जिंकत आपला विजयी रथ चालूच ठेवला होता.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एक महिन्यानंतर नीरजच्या उजव्या हाताच्या कोपरात अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे मे 2019 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो मैदानापासून बरेच दिवस लांब राहिला होता. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पोटचेफस्ट्रूम येथे झालेल्या स्पर्धेत त्याने 87.86 मीटर अंतरावर भाला फेक करत यशस्वी पुनरागमन केले. आणि टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के केले.

द ब्रिजने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2018मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणने (SAI) ने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) मध्ये चोप्राचा समावेश केला होता. याशिवाय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने अॅथलेटिक्सच्या प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठीचे एक वार्षिक कॅलेंडर मंजूर केले आणि ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या बजेटमधून नीरजला घसघशीत रक्कमही मिळालीय.