महाराष्ट्राच्या मातीत कला ही रुजलेली आहे.. गाणं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.. गाणं, संगीत आपल्या चाहोबाजूला आहे.. नीट ऐकलं तर संगीत प्रत्येक गोष्टीत आहे. मात्र सध्या सगळीकडेच या संगीताची स्पर्धा सुरु आहे . त्यामुळेच प्रेक्षकांना संगीताचा निखळ आनंद देण्यासाठी , सोमवार ९ डिसेंबर पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता सुरांची आणि शब्दांची एक मंत्रमुग्ध करणारी ” मेहफिल ” झी युवा या वाहिनीवर पहायला मिळणार आहे . या कार्यक्रमात मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक असे संगीतकार आहेत ज्यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ते आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या संगीतकार द्वयीं अविनाश विश्वजीत मधले एक आणि ह्या शोचे Music Master संगीतकार अविनाश चंद्रचूड.

इथे गाणं फक्त ऐकायला नाही मिळणार तर गाणं खऱ्या अर्थानं जिवंत होणार, गाणं तुम्हाला अनुभवता येणार. सोप्प्या शब्दात सांगायचं झालं तर इकडे गाण्याचा त्याच्या जन्मापासूनचा प्रवास घडवला जाणार आहे. इथे आपण फक्त गाणं ऐकून अनुभवणार नाही आहोत तर त्या गाण्याची गोष्ट इकडे सांगितली जाणार आहे. पडद्यावरचं आणि पडद्याच्या मागचं गाणं इकडे अनुभवता येणार आहे. ही मेहफिल त्या गाण्यांच्या, संगीताच्या, शब्दांच्या गोष्टींची मेहफिल आहे. आणि ह्या प्रत्येक गाण्याचा अत्यंत जिवंत आणि सुरेल अनुभव तुम्हाला मिळावा यासाठी ह्या शोचे Music Master संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि मंचावरच्या प्रत्येक गाण्याला स्वरसाज चढवणारे वाद्यवृंद तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल .

मेहफिल च्या MusicMaster संगीतकार अविनाश चंद्रचूड यांना कार्यक्रमाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले . ‘ मेहफिल ‘ या कार्यक्रमाच्या नावात सगळं आहे . ही आहे सुरांची आणि सूर ज्यांच्या श्वासात आहे अश्या काही ठराविक सेलिब्रिटी गायकांबरोबरील गप्पांची मेहफिल . या कार्यक्रमात आम्ही प्रेक्षकांना अप्रतिम गाण्यांची मेजवानी देणार आहोत. मी आणि माझे संगीतकार सहकारी प्रत्येक गाणं अजून किती जास्त चांगल्या प्रकारे वाजवू शकतो याचा योग्य अभ्यास करून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत . जुन्या काळात ज्या प्रमाणे सर्व संगीत वाद्यवृंदासोबत गाणे गायले आणि रेकॉर्ड केले जायचे त्याचप्रमाणे या मंचावर संपूर्ण लाईव्ह ऑर्केष्ट्रा असेल आणि गाणारे गायक प्रेक्षकांसमोर एक लाईव्ह गाणे सादर करतील . प्रत्येक आठवड्याला एका नवीन वाद्याच्या साथीने ही गाणी वाजवली जातील. पहिल्या एपिसोड स्पेशालिटी आहे ते म्हणजे ‘ व्हॉयलिन सेक्शन ‘. नेहमीच्या वाद्यांबरोबर व्हॉयलिन या वाद्याने त्या गाण्याला एक वेगळा साज आम्ही दिला आहे . “