मागील १४ दिवसांपासून शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने युतीमध्ये सत्तास्थापनेवरुन पेच निर्माण झाला होता. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली. कुठेतरी भाजपावर दबाव कायम ठेवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत होती. मात्र मुख्यमंत्रिपद सोडून इतर महत्वाच्या खाती समसमान देण्यासाठी भाजपा तयार झाली.

त्यामुळे शिवसेनाही आपला मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडून सत्तेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण सत्तेत सहभागी होण्यावरुन शिवसेनेतही दोन मतप्रवाह आहे. भाजपासोबत जाण्यासाठी शिवसेनेचे काही मंत्री इच्छुक आहेत. या बैठकीमुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना यांच्यातील चर्चेचं पहिला पाऊल पडल्याचं सांगण्यात येत आहे.

सत्तास्थापनेबाबत संभ्रमाचं वातावरण असताना सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन तणाव असताना या बैठकीला शिवसेनेचे ६ मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर यातील २ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सत्तास्थापनेवर चर्चा केल्याची माहिती आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना-भाजपा यांच्यातील सत्तास्थापनेवर, मंत्रिपदाच्या वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी आणि त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा एक प्रस्ताव असल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही अटी आहेत, पण शिवसेना पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

ओला दुष्काळाबाबत घेतलेल्या या बैठकीला रामदास कदम, दीपक केसरकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा यांच्यात कोणतीही चर्चा होत नव्हती. संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना आपली भूमिका मांडत होती. इतर कोणतेही नेते या प्रक्रियेपासून दूर होते. अशातच या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.