येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा “यवतेश्वर” म्हणतात.  या मंदिराचा अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा काहीसा रचनात्मक भाग आहे. या मंदिरासमोर नंदीमंडप आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आढळतात. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या बाजूस सिंह व हत्ती तर वरील बाजूवर पुराणकथांमधील काही दृश्ये कोरली आहेत.

मंदिराच्या परिसरात असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका पहावयास मिळतात. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश्य असलेली आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची जाणवते. पूर्व भागात असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्रासादाची रचना ही उत्तरेतील जैन मंदिरांच्या पार्श्वभूमीवर आधारलेली आहे.

पुरंदर तालुक्यात वसलेले माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधल्या गेले. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून भिंत, नगारखाना व शिखरे ही १८व्या शतकातील मराठा शैलीतील पहायला मिळतात. पूर्वी मूळ मंदिराचा भाग काहीसा विखुरलेला व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली घेण्यात आले.

इ. स. १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू असलेले “ब्रह्मेंद्रस्वामी” यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुन्याची शिखरे ऊभारली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले.

वसईच्या लढ्यातील विजयानंतर चिमाजी अप्पा पेशवे यांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. पाण्याची सोय व्हावी म्हणून ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये तळी बांधून दिलेली आहेत. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैलीचे प्रतिक झाल्याचे पहावयास मिळते. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत.