कार्तिकी गायकवाड एक गायिका म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हीच कार्तिकी  ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या भूमिकेविषयी तिच्याशी साधलेला हा संवाद
१. ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी तुला मिळाली आहे. ही संधी स्वीकारण्याचे नेमके कारण काय होते?
महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा खूप जुन्या काळापासून आहे. संतपरंपरेसोबत ही परंपरा चालत आली आहे. असं असूनही कुठल्याही वाहिनीवर अशा प्रकारचा कार्यक्रम या आधी झालेला नाही. या मंचाच्या माध्यमातून कीर्तन छोट्या पडद्यावर आलं व त्यात निवेदन करण्याची संधी चालून आली; त्यामुळे ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
२. या मंचावर तुझा एकंदरीत अनुभव कसा आहे? सेटवरची एखादी आठवण आम्हाला सांगशील का?
कीर्तनाच्या कार्यक्रमाचं निवेदन करत असताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. माझं घराणं हे वारकरी संप्रदायातील आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी फारच जवळचा विषय आहे. वारकरी संप्रदायाचे संस्कार बालपणापासूनच माझ्यावर आहेत, याचा फायदा निवेदन करतांना होतो असं मला वाटतं.
साधारण आजोबांच्या वयाचे एक गृहस्थ इथे आळंदीतच मला भेटले होते. ‘सा रे ग म प’ पासूनच तुला बघत आलोय, पण प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव कधी आला नव्हता. आता ‘गजर कीर्तनाचा’ च्या निमित्ताने रोज तुला पाहण्याची संधी मिळते. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो, असं ते मला सांगत होते. पण, एवढं बोलत असतानाच त्यांना खूप भरून आलं. हा अनुभव, हे प्रेम माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
३. कीर्तनाच्या स्वरूपातून सामाजिक संदेश देण्याची पद्धत तुला कशी वाटते? हा संदेश लोकांपर्यंत योग्यप्रकारे पोचतो, असं वाटतं का?
कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात येतं. अगदी जीवनातील आपलं वागणं-बोलणं, आचारविचार कसे असावेत हे कीर्तनातून सांगितलं जातं. अभंगाच्या निरुपणातून, एक चांगल्या पद्धतीची शिकवण देण्यात येते. त्यामुळे कीर्तन हा सामाजिक संदेश देण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं मला। वाटतं. संदेश लोकांपर्यंत पोहचण्याचं म्हणाल तर, साध्या सोप्या भाषेत संतमहंतांनी अभंग लिहून ठेवले आहेत. त्यामुळे त्यातून मिळणारा संदेश नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहचत असतो.
४. तू स्वतःदेखील उत्तम  गायिका आहेस. त्यामुळे सूत्रसंचालनाच्या बरोबरीनेच तुझेही कीर्तन ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे का?
मी स्वतःदेखील गायिका असल्याने, ‘ही केवळ निवेदन करते’ असं प्रेक्षकांना वाटू नये, याची काळजी आम्ही सुरुवातीपासूनच घेतली. गाणं आणि निवेदन या दोन्ही गोष्टी मी करते. त्यामुळे माझं गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना नेहमीच मिळते. बाबांच्या काही चाली या कार्यक्रमात मी सादर केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नवं काहीतरी ऐकण्याची संधी ‘गजर कीर्तनाचा’ मधून मिळत असते. प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा मला मिळू लागल्या आहेत.
५. तरुणांचा किर्तनाशी फार कमी संबंध येतो. या तरुण पिढीला, किर्तनाविषयी व त्याच्या संकल्पनेविषयी काय सांगशील? त्यांनाही यात आवड निर्माण व्हावी या साठी काय सांगशील?
तरुणवर्ग किर्तनाशी संबंधित नाही आहे, असं मला वाटत नाही. युवा किर्तनकारांची संख्या वाढतांना दिसत आहे. कीर्तनाचा आस्वाद घ्यायला येणारी तरुण पिढी सुद्धा आता वाढली आहे. तरुण पिढीला किर्तनाकडे आकर्षित करून घेण्यात, झी टॉकीजचा सुद्धा मोठा वाटा आहे, असं मला वाटतं. आताची एकंदर परिस्थिती पाहता, तरुणांनी सुद्धा कीर्तने ऐकणं व त्यातून शिकवण घेणं गरजेचं आहे.