लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे नवीन भाग पाहायला मिळत नाही आहेत. नव्याने मालिका सुरू होण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज लावणे कठीण असले, तरी तोपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आवश्यक आहे. पण अशातच ‘झी मराठी’वरचा लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ हा घरच्या घरी चित्रित करून नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. घरच्या घरी कलाकारांनी चित्रीकरण करून डिजिटली मालिकांची निर्मिती करण्यावर वाहिनी भर देत आहे.
याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “होम मिनिस्टरचे घरातच चित्रीकरण करून ते पुढे संकलनासाठी पाठवणे शक्य होते. टाळेबंदीच्या या काळात पुन्हा एकदा डिजिटली का होईना या कार्यक्रमात सहभागी होता येते आहे, याबद्दल महिलावर्गही आनंदी असल्याने हा नवीन प्रयोग वेगळा अनुभव ठरला. मोबाइल कसा ठेवून चित्रीकरण करायचे, ते फुटेज एका लिंकद्वारे संकलकापर्यंत कसे पोहोचवायचे हे सगळे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणारे कुटुंबही आपल्या नातेवाईकांसह दूर राहूनच चित्रीकरण करत आहेत.”