अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चर्चा आणि आणि उत्सुकता असलेल्या बहूप्रतिक्षीत अशा ”रिझवान” या सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक हरेश व्यास यांनी सिनेमा प्रदर्शनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या २ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केलेल्या ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळ्यात रिझवान सिनेमाची नेमकी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा ”रिझवान” सिनेमा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत ठरणार आहे यात शंका नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन हरेश व्यास यांनी केले असून सोहेल सेन यांनी संगीत दिलं आहे

रिझवान सिनेमाची कथा ही सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे चित्रपट प्रेमींना कुतूहलाने भारावून टाकणारी आहे. त्यामुळे चाहत्यांमधील अनोखा उत्साह सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. याच सत्य घटनांपासून प्रेरित होऊन दिग्दर्शक हरेश व्यास त्यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला रिझवान रुपेरी पडद्यावर घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरणारा ‘रिझवान’ हा सिनेमा हिंदी सिनेमाला अनोखी लकाकी प्राप्त करून देणारा आहे.

प्रख्यात आणि जगप्रसिद्ध उद्योगपती तसेच परोपकार हाच धर्म मानणारे रिझवान अडतिया यांच्या दैदिप्यमान आयुष्याचा लेखा जोखा या सिनेमाच्या माध्यमातून घेतला गेला आहे. राखेतून फिनिक्स भरारी घेणारे रिझवान कितीही मोठ्या संकटाना सामोरे जाण्याचा सयंम प्रदान करतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराने अफ्रिकेतील देशांचा परीघ व्यापला आहे. त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजातील गरजू आणि पीडित लोकांकरीता एक मदतीचा हात म्हणून आफ्रिका आणि भारतात सामाजिक व्यासपीठ उभे केले आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक हा पोस्टरच्या रूपाने प्रेक्षकांसमोर नुकताच आला. सोशल साईटच्या माध्यमातून त्याची दखल अनेक सिनेरसिकांना घेतली.

‘रिझवान’ सिनेमातील सत्य कथेचा एक एक संदर्भ मनमोहक गुलदस्त्या प्रमाणे गुंफणारे दिग्दर्शक हरेश व्यास म्हणतात, सिनेमाची कथा जेव्हा एखाद्या सत्य घटनेवर आधारित असते तेव्हा ती सादर करताना एक मोठी जबाबदारी दिग्दर्शकाच्या खांद्यावर असते. मनोरंजन करण्याच्या आवेगात मूळ कथेला धक्का लागणार नाही किंवा त्याची विटंबना होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. सत्य कथा, घटना, आव्हानं यांना मी सिनेमात पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रिझवान’ सिनेमाला पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यापाठी असणाऱ्या प्रत्येक कलाकाराची यशस्वीपणे साथ मिळाली. लवकरच प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षकही त्यावर भरभरून प्रेम करतील असा विश्स्वास आहे.