“गोष्ट तशी गमतीची’चा सिक्वेल लवकरच येणार रंगमंचावर!!
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच नाटकांचे सिक्वेल पहायला मिळाले आहेत. नुकताच
“गोष्ट तशी गमतीची” या नाटकाचा ४००वा प्रयोग गडकरी रंगायतन,ठाणे येथे एन. चंद्रा, आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, अनंत जोग, भाऊ कदम, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे-शेठ आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी “गोष्ट तशी गमतीची” या नाटकाचा सिक्वेल लवकरच रंगमंचावर पहायला मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आता या सिक्वेलमधून गमतीच्या गोष्टीच नाट्य अधिक नाट्यमय होणार आहे.
“गोष्ट तशी गमतीची” या नाटकात करिअर कुठलं निवडायचं या संदर्भात वडील आणि मुलगा यांच्यात संघर्ष निर्माण होतो. वडील आपले अनुभव मुलाला सांगतात मात्र, ते काही त्याला पटत नाहीत. तरीही त्यातून सुवर्णमध्य काढण्याच्या कल्पनेवर नाटक संपतं. आता पुढच्या भागात ही गोष्ट अजून पुढे जाणार आहे. पुन्हा वडील-मुलाचीच जुगलबंदी नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, ती अधिक प्रगल्भ आणि नाट्यमय पद्धतीनं मांडण्यात आली आहे.
सोनल प्रॉडक्शनतर्फेच हा सिक्वेल रंगमंचावर येणार आहे. मिहिर राजदा यांनीच नाटकाचं लेखन केलं असून, अद्वैत दादरकर यांनी दिग्दर्शन केलं आहे तर नंदू कदम हे या नाटकाचे निर्माते आहेत. शशांक केतकर, लीना भागवत, मंगेश कदम यांच्या त्यात भूमिका आहेत. आता या सिक्वेलमध्ये याच तीन भूमिका असणार, की अजून काही व्यक्तिरेखा रंगमंचावर येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नाटकाच्या सिक्वेलबद्दल मंगेश कदम म्हणाले, ‘गोष्ट तशी गमतीची हिट झालं म्हणून दुसरी भाग करायचा असा काही प्रकार या सिक्वेलच्या निर्मितीमध्ये नाही. तर सिक्वेल हा गरजेतून निर्माण झाला आहे. आमच्या चर्चेत नाटक अजून पुढे जाऊ शकतं, त्यात पूर्णपणे वेगळे मुद्दे मांडता येऊ शकतात, याची जाणीव झाल्यानं सिक्वेल लिहिला गेला. व्यावसायिक लाभ डोळ्यासमोर ठेवून सिक्वेल करण्याचा अजिबात प्रयत्न नाही. पहिल्या भागातील व्यक्तिरेखा आता अधिक प्रगल्भ झाल्या आहेत. स्वाभाविकच यातील नाट्यही अधिक गहिरं होणार आहे. पहिल्या भागावर जसं प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं, तसंच सिक्वेलवरही नक्की करतील याची खात्री आहे.’