अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी शिस्तीचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे. “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी चित्रीकरणापूर्वी चित्रपटाची संहिता मागवून घेतली आणि दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँकॉकला गेले. त्या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यावर ते ठरल्यानुसार गोष्ट एका पैठणीच्या सेटवर दाखल झाले, त्यावेळी त्यांचे सर्व संवाद तोंडपाठ होते. त्यांच्या शिस्तबद्ध वागण्याने सर्वजण थक्क झाले.
“गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स करत आहेत. अक्षय बर्दापूरकर चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी यांच्यासह मिलिंद गुणाजींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इनामदार असं त्यांच्या भूमिकेचं नाव आहे. बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तिच्या आदेशाने सगळी कामं करणारा, प्रेम करणारा खानदानी असा हा माणूस आहे.
इनामदार या भूमिकेसाठी मिलिंद गुणाजी यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय अचूक आहे. त्यांची आवाज, उंची, अभिनयाच्या जोरावर या भूमिकेला न्याय दिला आहे. तसंच त्यांचं शिस्तबद्ध वागणंही प्रेरणादायी आहे, असं निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं.